सैराट! भिवंडीत हजारो महिलांची बाईक रॅली

सैराट! भिवंडीत हजारो महिलांची बाईक रॅली
नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरातील महिलांकरता उमंग बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीत २५०० हून अधिक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आणि फेटे बांधून सहभाग घेतला होता. द्रोण फाऊंडेशनच्या वतीने अशा महिलांकरिता या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मागील पंधरा दिवसात या रॅलीत सहभागी होण्यासाठी तब्बल १५०० महिलांनी नाव नोंदणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्याहून अधिक महिला या बाईक रॅलीत सहभागी झाल्या होत्या . महिला सक्षमीकरण, बेटी बचाव बेटी पढाओ, महिलांवरील अत्याचार थांबवा, महिला साक्षरतेला पाठिंबा द्या… अशा पद्धतीचे फलक या महिलांनी बाईकला लावले होते. अनेक महिला पोलीस कर्मचारीही आपल्या पोलीसी गणवेशात या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.शिवाजी चौक या ठिकाणी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला. स्वाभिमान सेवा संस्थेच्या वतीने संतोष शेट्टी, माजी नगरसेविका शशीलता शेट्टी यांनी या बाईक रॅलीचे स्वागत गुलाब पाकळ्यांची उधळण करीत केले.
 द्रोण फाऊंडेशनच्या माध्यमातून या बाईक रॅलीचे मागील पाच वर्षांपासून आयोजन करण्यात येते. सहभागी महिलांचा आयोजक संस्थेच्या वतीने लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रथम तीन महिलांना सोन्याच्या आंगठ्या आणि पंधरा महिलांना भेटवस्तू देऊन सन्मान केला गेला. या रॅलीत डॉक्टर, वकील, लोकप्रतिनिधी, महाविद्यालयीन तरुणी, गृहिणींसह महिला पोलिस अधिकारीही सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमास पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी शुभेच्छा देत, ‘महिलांचा सन्मान वर्षभर होणे गरजेचे असून महिला सुरक्षा व महिला सक्षमीकरण यासाठी पोलीस यंत्रणा सदैव महिलांच्या पाठीशी उभी आहे’, असा विश्वास बोलून दाखवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द्रोण फाऊंडेशन चे प्रमुख पदाधिकारी विनोद गुप्ता, राकेश पटवारी, प्रोजेक्त प्रमुख हरेश बिस्वाल, शिव चौधरी, विजय जैन, डॉ. नूतन मोकाशी, भूपेश गुप्ता, आनंद रुंगठा यांनी विशेष मेहनत घेतली .
First Published on: March 10, 2019 3:53 PM
Exit mobile version