६२ लाख रुपयांच्या लुटीप्रकरणी तिघांना अटक

६२ लाख रुपयांच्या लुटीप्रकरणी तिघांना अटक

प्रातिनीधीक फोटो

मुंबई : खार येथे दिवसाढवळ्या एका फ्लॅटमध्ये घुसून एका महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना डांबून तसेच घातक शस्त्रांचा धाक दाखवून सुमारे ६२ लाख रुपयांच्या लुटीप्रकरणी तीन संशयित आरोपींना खार पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. मोहम्मद वारीश मोहम्मद आरिफ शेख, मोहम्मद अक्रम अब्दुल समर इद्रीसी आणि सुजीतकुमार जयवंत ठाकूर अशी या तिघांची नावे आहेत.

अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने शुक्रवार २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील तीन आरोपी वॉण्टेड असून ते या कटातील मुख्य आरोपी असल्याचे बोलले जाते. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. ही घटना ५ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ खार येथील एस. व्ही. रोडवरील पाचवा रोड, भूमी गोविंद भवनमध्ये घडली होती. या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १२०२ मध्ये नादीरअली सय्यद हे कापड व्यापारी त्यांची पत्नी कोहीनूर आणि दोन मुलांसोबत राहतात. नादीरअली यांचे कपड्याचे दोन दुकान आहे. त्यांच्यासह त्यांचे काही मित्र आपापसात भिसी चालविण्याचे काम करतात. त्यांचा २१ जणांना एक ग्रुप असून त्यांच्यात ५० लाख रुपयांची भिसी चालते. सप्टेंबर महिन्यांत नादीरअली यांनी भिसीचे ५० लाख रुपये तसेच एक दुकान खरेदीसाठी दहा लाख असे साठ लाख रुपये घरी आणले होते.

५ सप्टेंबरला सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले. यावेळी घरी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले होती. सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या घरी तीनजण कुरिअर देण्याचा बहाणा करून घुसले. या तिघांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून या तिघांना ओढणीने एका रुममध्ये बांधून ठेवले. त्यानंतर कपाटातील सुमारे ६० लाख रुपयांची कॅश, १ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपयांचा एक मोबाईल असा सुमारे ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले. हा प्रकार कोहिनूरकडून तिच्या पतीला समजताच त्याने खार पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर खार पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

First Published on: October 24, 2018 3:50 AM
Exit mobile version