भिवंडीत साडेतीन लाखाचा गावठी दारूसाठा जप्त

भिवंडीत साडेतीन लाखाचा गावठी दारूसाठा जप्त

भिवंडीत साडेतीन लाखाचा गावठी दारूसाठा जप्त

भिवंडी तालुक्यातील पडघा पोलिसांनी चिराडपाडा हद्दीतील भातसा नदीच्या किनारा लगतच्या झाडोऱ्यात छापेमारी केली आहे. या छाप्यामध्ये ३ लाख ६८ हजार ५० रुपये किंमतीचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त करून तो नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईत पडघा पोलिसांनी दोन दारू माफियांना पकडून गजाआड केले आहे. दारू माफिया सचिन नारायण मारके (२८ राहणार चिराडपाडा) आणि पुरुषोत्तम मधुकर गावंड (३५ राहणार उल्हासनगर) असे या दोघा दारू माफियांची नावे आहेत. सद्या लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरु असून निवडणूकीत बहुतांशी राजकीय पुढारी आपल्या समर्थक तळीरामांना खुश करण्यासाठी दारू पाण्यासारखी वाटप करीत असल्याचे प्रत्येक निवडणूकीत उघडपणे दिसून आले आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पडघा पोलीस अधिक सतर्कतेने ग्रामीण परिसरात नजर ठेवून आहेत.

माफियांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात येणार

सतर्कतेच्या आधारावर पोलिस हवालदार जयसिंग राठोड यांना खबर मिळाली होती कि, चिराडपाडा गावा नजीकच्या भातसा नदी किनाऱ्याच्या झाडीझुडूपात दारू माफियांनी मोठी गावठी दारूची हातभट्टी लावून व्यवसाय सुरु केला आहे. त्यानुसार पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे पोलीस हवालदार साईनाथ कराळे ,एस.एस.निकम, पोलीस धनंजय राठोड आदींच्या पोलीस पथकाने चिराडपाडा लगतच्या भातसा नदी किनारी गावठी दारूच्या भल्या मोठ्या हातभट्टीवर छापा मारला. यावेळी दारू बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल साखर, काळा गूळ, नवसागर आणि भले मोठे ड्रम, दारूची डिग्री तपासण्यासाठी लागणारी तापमापी, पाण्याची मोटार, प्लास्टिक कॅन, अल्युमिनियम सतेला आदी तब्बल ३ लाख ६८ हजार ५० रुपये किंमतीचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. गजाआड केलेल्या त्या दोन दारू माफियांना गुरुवारी २५ एप्रिल रोजी भिवंडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार जयसिंग राठोड करीत आहे.

First Published on: April 24, 2019 10:02 PM
Exit mobile version