तृतीयपंथीयांची तंबाखू व्यसनमुक्तीसाठी मोहीम

तृतीयपंथीयांची तंबाखू व्यसनमुक्तीसाठी मोहीम

तृतीयपंथीयांची व्यसनमुक्तीसाठी जनजागृती

दिवसेंदिवस कर्करोगांच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ही रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात का होईना कमी व्हावी, यासाठी ५ तृतीयपंथीयांनी पुढाकार घेतला आहे. जे कधी काळी स्वत: तंबाखूच्या विळख्यात अडकले होते. पण, आता हे पाचही तृतीयपंथी या व्यसनातून पूर्णपणे मुक्त होऊन त्यांनी समाजाला तंबाखूचे व्यसन शरीरासाठी किती घातक आहे, हे समजावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचा कॅन्सर पेशंट अ‍ॅण्ड असोसिएशनतर्फे जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर ३० मे रोजी सत्कार करण्यात येणार आहे.

कॅन्सर पेशंट्स अ‍ॅण्ड असोसिएशनतर्फे जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्यानिमित्ताने तृतीयपंथीयांची चाचणी केली असता त्यातील तब्बल ७५ टक्के लोक कोणत्या ना कोणत्या स्वरुपात तंबाखूचे सेवन करत असल्याचे आढळले. तर त्यातील ४० टक्के लोकांमध्ये कर्करोगपूर्व व्रण आढळून आले आहे. तोंडाचा कर्करोग होण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन अनेकदा कारणीभूत ठरते आणि त्यातून मृत्यू ओढवतो. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी विक्रम शिंदे, माधुरी शर्मा, प्रिया पाटील, माही गुप्ता आणि मोना कांबळे या पाच तृतीयपंथींनी तृतीयपंथीयांमध्ये तंबाखूचे वाढते व्यसन कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

कोणत्याही तृतीयपंथीने तंबाखू, पानमसाल्याचे सेवन करू नये, यासाठी ते आग्रहाने काम करत आहेत. या कामाचा गौरव व्हावा म्हणून कॅन्सर पेशंट अ‍ॅण्ड असोसिएशनतर्फे जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर ३० मे रोजी या पाचही तृतीयपंथीयांचा सत्कार करण्यात येणार आहे.

तृतीयपंथी हे मोठ्या प्रमाणावर समाजाचे वंचित घटक मानले जातात. रुग्णालये बऱ्याचदा त्यांना दाखल करून घेत नाहीत. त्यांना उपचार देत नाहीत. त्यांच्यापुढे प्रश्न असतो त्यांना कोणत्या वॉर्डमध्ये दाखल करायचे. मोठ्या प्रमाणावर तृतीयपंथी हे तंबाखूचे कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सेवन करत असतात. त्यात विडी, गुटखा, सिगारेट आणि पान यांचा समावेश असतो. तणाव, भूक या गोष्टींमुळे त्यांच्यात निद्रानाश येतो आणि त्यातून हा विकार जडतो. त्याशिवाय या घटकाला कोणत्याही प्रकारे विमाकवच नसते. त्यामुळे समाजातील हा घटक कायम दुर्लक्षित राहतो, असे असोसिएशनच्या कार्यकारी संचालिका अनिता पीटर म्हणाल्या.

First Published on: May 18, 2018 7:30 AM
Exit mobile version