सेना-भाजप युती टिकवण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर?

सेना-भाजप युती टिकवण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर?

फोटो सौजन्य - फ्री प्रेस जर्नल

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती टिकणार की तुटणार?याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.शिवसेनेने जरी ‘एकला चलो’चा नारा दिला असला तरी, भाजप मात्र युतीसाठी आशावादी आहे.याच पार्श्वभूमिवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.मात्र,भाजपने युतीसाठी एक पाऊल पुढे टाकण्यास तयार असल्याचे स्पष्ट करत शिवसेनेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर देखील शिवसेनेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद आला नाही.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे-अमित शहा यांची भेट महत्त्वाची आहे.

युतीसाठी केंद्रीय नेतृत्वाचा पुढाकार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.यामध्ये प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याची रणनिती आखण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरूनच अमित शहा हे मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचे कळतंय.बुधवारी संध्याकाळी सहा वाजता ही भेट होणार आहे.यावेळी लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्राथमिक बोलणी होणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.

युती नाहीच!

सत्तेत असले तरी, ‘तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना’ अशीच सध्या शिवेसेना-भाजपची स्थिती आहे. शिवाय, पालघर निवडणुकीदरम्यान देखील दोन्ही मित्र पक्षांनी एकमेकांवर राजकीय चिखलफेक केली.पालघरमध्ये पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे पाठिंबा काढत सरकार अस्थिर करतील अशी शक्यता देखील राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती.यावेळी उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचा पुनरूच्चार केला.उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावरून शिवसेनेत दोन गट पडल्याची शक्यता आहे.यामध्ये निवडणुका स्वबळावर लढवण्यास एका गटाने विरोध केल्याची माहिती आहे.त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर देखील मोठा राजकीय पेच आहे.यातून उद्धव ठाकरे कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचेच डोळे लागून राहिले आहेत.

भाजपची प्रतिक्रिया काय?

शिवेसेनेने जरी स्वबळाचा नारा दिला असला तरी भाजप अजूनही युतीबद्दल आशावादी आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी तशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.”शिवसेना भाजप युती तुटल्यास त्याचा फायदा हा विरोधकांना होईल” अशी प्रतिक्रिया सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.त्याला अद्याप तरी शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही.शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास ‘जशास तसे’ उत्तर देण्यास तयार राहण्याचे आदेश देखील भाजपने कार्यकर्त्यांना दिले आहेत.त्यामुळे युतीचे काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल.

First Published on: June 5, 2018 2:44 AM
Exit mobile version