आजपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आहे. शिवाय आज पहिला मार्गशीर्ष गुरुवार आणि देव दीपावली देखील आहे. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घरोघरी देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात, या महिन्यात देवी लक्ष्मीची पूजा आराधना केल्यानंतर कुटुंबात सुख-समृद्धी येते. आज पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे.
तसेच या महिन्यात 5 मार्गशीर्ष गुरुवार असणार आहेत. पहिला गुरुवार आज म्हणजेच 24 नोव्हेंबर रोजी असून 22 डिसेंबर रोजी शेवटचा गुरुवार असणार आहे. आज पहिल्या मार्गशीर्ष गुरुवाराव्यतिरिक्त देव दीपावली देखील साजरी केली जाईल. देव दीपावलीला दीवाळी प्रमाणेच घरामध्ये दिवे लावले जातात.
मार्गशीर्ष महिन्याचे काय आहे महत्व?
मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मींसोबतच श्री विष्णूंची देखील पूजा-आराधना केल्यास आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबावर सदैव लक्ष्मी-नारायणांचा आर्शिवाद प्राप्त होतो. हिंदू धर्मात या महिन्याला श्रावण महिन्या इतकेच पवित्र मानले जाते.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा या मंत्राचा जप
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आज ऊँ श्रीं श्रियै नमः। या मंत्राचा जप करा. या मंत्रामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील.
असे केले जाते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत
- आंब्याच्या डहाळय़ा, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचं रूपात स्थापना केली जाते.
- या कलशाला सजवून आरास केली जाते. यानंतर स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य दाखवला जातो.
- या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पाच पत्री, पाच फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक वेणी, नारळ या गोष्टी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी लागतात.
- लक्ष्मीला गोडोधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा महिलांकडून केली जाते.
- दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदीकुंकू देऊन सवाष्णींना फळे तसेच इतर वाण दिले जाते.