राज ठाकरेंची चौकशी; दक्षिण मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त

राज ठाकरेंची चौकशी; दक्षिण मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त

कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार राज ठाकरे यांना ईडीने २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आज राज ठाकरे ईडी कार्यालयात जाणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीच्या नोटीशीवर मनसे कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे काही गैरप्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात आणि राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर या चौकशीच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीतही बदल करण्यात आले आहे. राज ठाकरेंचे निवासस्थान असणाऱ्या कृष्णकुंजवरुन ईडी ऑफीसला जाणारा मार्ग बदलण्यात आला आहे.

मुंबईत चौका-चौकांवर पोलीस बंदोबस्त

राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईच्या चौकाचौकात पोलीस गाड्या उभ्या आहेत. याशिवाय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या बसेसला लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अगोदरच पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मनसेच्या इतर कार्यकर्त्यांची धरपकड सुरु झाली आहे.

First Published on: August 22, 2019 7:59 AM
Exit mobile version