पहिल्या रेल्वे प्रवासाचे ऐतिहासिक इंजिन लवकरच ठाणे स्थानकात

पहिल्या रेल्वे प्रवासाचे ऐतिहासिक इंजिन लवकरच ठाणे स्थानकात

पहिल्या रेल्वे प्रवासाचे ऐतिहासिक इंजिन लवकरच ठाणे स्थानकात (अमित मार्कंडे )

बोरीबंदर ते ठाणे या रेल्वे सेवेला मंगळवारी १६ एप्रिलला १६६ वर्षे पूर्ण झाली. या रेल्वेचे ऐतिहासिक इंजिन ठाणे रेल्वे स्थानकात आणावे यासाठी २०१६ मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूरीही दिली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊले उचलली जात नसल्याने आता जिल्हाप्रशासनाकडूनही हे इंजिन ठाण्याला मिळावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे लवकरच हे ऐतिहासिक इंजिन ठाणेकरांना पाहता येईल.

ऐतिहासिक रेल्वे इंजिन ठाणे स्थानकात येण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेच, आता जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याने ठाणेकरांना ही अमूल्य भेट लवकरच मिळेल, अशी अपेक्षा करूया.

— संजय केळकर, आमदार

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन

१६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या स्थानकादरम्यान, सुरू झालेल्या रेल्वे सेवेला मंगळवारी १६६ वर्षे पूर्ण झाली. या रेल्वेला बसविण्यात आलेले इंजिनचे ऐतिहासिक महत्व ठाणेकरांना कळावे यासाठी प्रवासी संघटनेच्या कार्यकत्यांनी २०१६ मध्ये आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन हे इंजिन ठाण्यात आणावे अशी मागणी केली होती. त्यानुसार संजय केळकर यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळी सुरेश प्रभु यांनी हे रेल्वेचे इंजिन ठाणे रेल्वे स्थानकात आणण्यासाठी मंजूरीही दिली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्याप हे इंजिन ठाणे स्थानकात येऊ शकलेले नाही. त्यामुळे आता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. नुकतीच राजेश नार्वेकर यांची संजय केळकर यांनी भेट घेतली होती. त्यावेळी आता जिल्हा प्रशासन रेल्वेकडे इंजिन आणण्याबाबत पाठपुरावा करेल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

ऐतिहासिक रेल्वे इंजिन जर ठाणे रेल्वे स्थानकात आले तर, तरूण पिढीला रेल्वेचा इतिहास समजून घेणे सोपे होईल. त्यामुळे लवकरात लवकर हे इंजिन ठाणे स्थानकाला मिळायला हवे.

–नंदकुमार देशमुख, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना, अध्यक्ष

First Published on: April 16, 2019 6:46 PM
Exit mobile version