भंगारातील बेस्टच्या बसेसमध्ये शौचालय

भंगारातील बेस्टच्या बसेसमध्ये शौचालय

Best Bus

बेस्ट उपक्रमाने भंगारात काढलेल्या बसगाड्यांच्या रुपांतर सुसज्ज अशा फिरत्या स्वच्छतागृहांमध्ये करण्यास शनिवारी महापालिकेने मंजुरी दिली. बेस्ट समितीत विरोध करणारे पहारेकर्‍यांनी याबाबत मौन बाळगले, मात्र विरोधी पक्षनेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत बेस्टचे महत्व त्या बसेसमध्ये शौचालय उभारुन कमी करू नका,असे सांगत तीव्र विरोध केला. परंतु शिवसेनेने भाजपामदतीने हा प्रस्ताव मंजूर केला. आधीच बेस्टला मदत न करणार्‍या शिवसेनेचा या निर्णयामुळे एका अर्थाने बेस्टचे महत्व संपवण्याचा डाव उघड झाला.

बेस्ट उपक्रमाने भंगारात काढलेल्या काही बसगाड्यांचे रुपांतर सुसज्ज अशा फिरत्या स्वच्छता गृहांमध्ये करून ते मुंबईतील महामार्ग, हम रस्तेे व लहान मोठे रस्ते यावर उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. बेस्ट बसचे आयुष्य हे १५ वर्षे संपल्यानंतर मोडीत निघतात. त्यामुळे भविष्यात बेस्ट उपक्रमाकडून १० मोडित काढलेल्या बसगाड्या उपलब्ध होती. या बस गाड्या हव्या असल्यास लिलावात प्राप्त झालेल्या दरात बेस्ट महापालिकेस उपलब्ध करून देईल. जर या बसगाड्या चालूस्थिती हव्या असल्यास त्याची योग्यप्रकारे दुरुस्ती करून आवश्यक असणार्‍या परवानग्या संबंधितांकडून घेण्याची व्यवस्था महापालिकेस करावी लागेल,असे बेस्टने महापालिकेस कळवले होते.

त्यानुसार बेस्टच्या अभिप्राय सभागृह नेत्या विशाखा राउुत यांनी पटलावर मांडल्यानंतर, याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तीव्र विरोध केला. बेस्ट बस ही मुंबईची शान आहे. ती शान कायम राहायला हवी,असे सांगत त्यांनी जुन्या बसेसचे रुपांतर शौचालयांमध्ये करून त्यांची शान घालवू नका,असे सांगितले. मुंबईत २२ हजार शौचकुपे महापालिका बांधणार आहे. जर मेट्ोसह महामार्गावर जर शौचालये नसतील तर महापालिकेने तिथे बांधावी. त्यासाठी बस गाड्यांचा उपयोग करणे योग्य ठरणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले. बेस्ट आर्थिक तोट्यात आहे. पण या उपक्रमास महापालिकेच्यावतीने अनुदान देण्यास सत्ताधारी पक्ष अपयशी ठरला आहे. किमान त्या उपक्रमाची लाज तरी घालवू नका,असेही खडे बोल त्यांनी सुनावले. यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भाजपच्या मदतीने प्रस्ताव मंजूर केला.

बेस्ट बसचे केवळ भंगारातील सांगाडे असणार आहे. त्यावर कुठेही बेस्टचे नाव नसेल. या सांगाड्यांमध्ये सुधारणा करत शौचालय बनवले जाईल. मोनो रेल, मेट्ो रेल्वेच्या खांबाजवळ ही शौचालये उपलब्ध करून दिली जातील.जेणेकरून भविष्यात एमएमआरडीए शौचालयांचे बांधकाम करेपर्यंत या फिरत्या शौचालयांचा वापर जनतेला करता येईल.
विशाखा राउुत, सभागृहनेत्या, महापालिका

First Published on: March 10, 2019 5:05 AM
Exit mobile version