मनधरणीसाठी खासदार ‘कलानी’ महालात

मनधरणीसाठी खासदार ‘कलानी’ महालात

Omi Kalani and Shrikant Shinde

‘टीओके’चे अध्यक्ष ओमी कलानी यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला समर्थन करणार नाही, असा इशारा दिल्यानंतर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी रविवारी ओमी कलानी यांची भेट घेतली. मात्र, कलानी यांनी कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने शिंदे यांचे प्रयत्न तूर्त निष्फळ ठरले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभेचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र, आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कामगार रुग्णालयाचे भूमिपूजन झाले. या भूमिपूजन कार्यक्रमापासून आमदार ज्योती कलानी आणि महापौर पंचम कलानी यांना लांब ठेवण्यात आल्यामुळे टिओके प्रवक्ते कमलेश निकम यांनी नाराजी व्यक्त करीत खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार न करण्याची भूमिका जाहीर केली होती. यामुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यानंतर खासदार शिंदे यांनी ओमी कलानींबरोबर फोनवरून संवाद साधला होता.

रविवारी रात्री उशिरा कलानी महलच्या पटांगणात टिओके कार्यकर्त्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत उशिरा खासदार श्रीकांत शिंदे, राजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड आणि अरुण आशान हे उपस्थित झाले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कलानी यांच्या संघटनात्मक गुणांचे कौतूक केले. शहरप्रमुख राजेन्द्र चौधरी यांनी केलेल्या भाषणात पप्पू कलानी यांनी शहर विकासासाठी केलेली मेहनत आणि विद्यमान महापौर पंचम कलानी यांच्या कार्याचा गौरव केला. या बैठकीत टिओके अध्यक्ष ओमी कलानी, महापौर पंचम कलानी, युटीए अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, फेडरेशन ऑफ मॅन्युफॅक्चुरिंग असोसिएशनचे अध्यक्ष पितु राजवानी, सुंदर मुदलियार, विविध सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी पदाधिकार्‍यांची ताकद उल्हासनगर शहरात केंद्रात कार्यरत असलेल्या राजकीय पक्षाचीही नसल्याचे यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत २४ तासांत निर्णय घेऊ, असे आश्वासन ओमी कलानी यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा
याविषयी ओमी कलानी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, टिओके आणि भाजप यांची महापालिकेत आघाडी आहे. ही आघाडी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शब्दावर झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या आदेशानंतर पाठिंबा दिला जाईल, असे ओमी कलानीने सांगितले.

First Published on: March 19, 2019 4:05 AM
Exit mobile version