टोसिलीझुमॅब कोरोनावरील औषध नाही; सिप्ला कंपनीकडून स्पष्टीकरण!

टोसिलीझुमॅब कोरोनावरील औषध नाही; सिप्ला कंपनीकडून स्पष्टीकरण!

कोरोनासाठी दिलासादायक ठरत असलेले टोसिलीझुमॅब या इंजेक्शनचा राज्यात सर्वत्र तुटवडा जाणवत असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. मात्र हे इंजेक्शन कोरोनावरील उपचारासाठी नसून, त्याला कोरोना औषध म्हणून मान्यता नसल्याचे सिप्ला कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे टोसिलीझुमॅब इंजेक्शनच्या शोधात असलेल्या कोरोना रुग्णांसाठी हा एक प्रकारे धक्काच मानला जात आहे.

इंजेक्शनाचा काळ्या बाजारात

रेमडेसिवीर व टोसिलीझूमॅब ही इंजेक्शन कोरोनावर गुणकारी ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात टोसिलीझूमॅब इंजेक्शन देण्यात येत आहे. त्यामुळे बाजारामध्ये टोसिलीझूमॅबचा तुटवडा निर्माण झाल्याने 40 हजार रुपयांना असलेले हे इंजेक्शन काळ्या बाजारात एक लाखांपर्यंत विकले जात होते. सलग तीन महिन्यांपासून टोसिलीझूमॅब हे इंजेक्शन रुग्णांना दिले जात असताना आता अचानक भारतामध्ये टोसिलीझूमॅबचे वितरक असलेल्या सिप्ला या कंपनीने हे इंजेक्शनला कोरोनावरील औषध म्हणून मान्यता मिळाली नसल्याचे नुकतेच स्पष्ट केले आहे. टोसिलीझूमॅब या इंजेक्शनची निर्मिती रोश प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात येते. टोसिलीझूमॅबमुळे कोरोनाग्रस्तांना फायदा होत असल्याचे स्पष्ट झाले नाही. हे इंजेक्शन हाडांसंदर्भात असलेल्या रिहोमेटोलॉजिकल डिसऑर्डरसारख्या रिहोमॅटॉईड आथ्रटीस, सिस्टमिक अ‍ॅण्ड पॉलीआर्टिक्युलर ज्युवेनाईल आयडिओपॅथीक आथ्रटीस यासारख्या अनेक आजारांवर हे औषध वापरण्यात येत असल्याचे सिप्ला कंपनीकडून सांगण्यात आले. दरम्यान भारतामध्ये मे 2020 पासून अ‍ॅक्टेमरा टोसिलीझूमॅबच्या मागणीत अचानक वाढ झाली. त्यानंतर अ‍ॅक्टेमरा टोसिलीझूमॅबच्या जगभरासह भारतामध्ये कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील काही चाचण्यांचे निकाल समोर आले तर अद्याप काही चाचण्यांचे निकाल शिल्लक आहेत.

तिसर्‍या टप्प्यातील चाचणी अयशस्वी

कोविडसंदर्भात टोसिलीझूमॅब इंजेक्शनची रोश कंपनी प्राथमिक व द्वितीय स्तरावरील चाचण्या करण्यात आल्या. मात्र तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या अयशस्वी ठरल्या. क्लिनिकल स्टेट्समध्ये कोणतीही सुधारणा दिसली नाही. हे इंजेक्शन घेतल्यानंतर मृत्यूच्या दरात घट होत असल्याचे कोठेही स्पष्ट झाले नसल्याचे रोश कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

सिप्ला कंपनीकडून तीन महिन्यांपासून इंजेक्शनची विक्री होत असताना त्यांना हे औषध कोरोनावर उपयुक्त नसल्याचे कळले नव्हते का? अनेक लोकांनी टोसिलीझूमॅबमुळे कोरोना बरा होत असल्याने हे औषध लाखो रुपयांना विकत घेतले आहे. या औषधाचे दुष्परिणाम होऊन अनेकांचे प्राण गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोसिलीझूमॅब इंजेक्शन देण्यात आलेल्या रुग्णांना नुकसान भरपाई देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत.
– अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग्स लायसन्स होल्डर फाऊंडेशन
First Published on: August 17, 2020 8:50 PM
Exit mobile version