शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार व उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे

शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी व्यापार व उद्योग क्षेत्राने योगदान द्यावे

‘देशाचा प्रमुख घटक असलेल्या शेतकऱ्याच्या जीवनमानात बदल घडविण्यासाठी आणि त्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापार आणि उद्योग क्षेत्राने प्रयत्न करणे गरजेचे आहेत. त्यासाठी शेतमाल वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी सर्वंकष धोरणाचा प्रयत्न व्हावा,’ अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली. मालवाहतूक क्षेत्राशी संबंधित ‘कोल्ड चेन’ या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल कोश्यारी बोलत होते. यावेळी शीत साखळी वाहतूक (सप्लाय चेन मॅनेजमेंट) क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी विविध कंपन्यांना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

राष्ट्रबांधणीचे कार्य समजून प्रयत्न करावेत

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘असोचॅम’ आणि ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन ऑफ इंडिया – टिसीआय’ यांनी या परिषदेचे संयोजन केले. यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, “शेतीमालाचा आणि विशेषतः नाशवंत अशा मालाच्या वाहतुकीच्या अद्ययावत सुविधांमुळे हाती आलेले उत्पादन वाया जाण्याचे प्रमाण कमी करता येऊ शकते. भारतातील शेती वैविध्यपूर्ण असून त्यामुळे उत्पादनातसुद्धा वैविध्य आहे. त्यामुळे नाशवंत अशा शेतीमालाच्या शेतकरी ते ग्राहक या दरम्यानच्या वाहतुकीबाबत सर्वंकष प्रणाली तयार करण्यासाठी धोरण आखावे लागेल. त्यामध्ये शेतकर्‍यांसह विविध घटकांशी विचारविनिमय करावा लागेल. शेतीमालाची प्रभावी वाहतूक प्रणाली शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करू शकते. त्यातून त्यांच्या जीवनात बदल घडवता येईल. त्यांचे जीवनमान उंचावता येईल. हेही एक राष्ट्रबांधणीचे कार्य आहे, असे समजून व्यापार व उद्योग क्षेत्राने प्रयत्न करावेत,” असेही त्यांनी सांगितले.

First Published on: October 11, 2019 5:55 PM
Exit mobile version