डोंबिवलीतील टिळकनगरच्या बाप्पांची पारंपरिक विसर्जन मिरवणूक संपन्न

डोंबिवलीतील टिळकनगरच्या बाप्पांची पारंपरिक विसर्जन मिरवणूक संपन्न

डोंबिवलीतील नावाजलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नेत्रदीपक विसर्जन मिरवणूक पार पडली. पालखीत विराजमान श्रींची लोभसवाणी मुर्ती, त्यापुढे मावळ्यांच्या वेशभुषेत अब्दागिरी धरून उभे असलेले मंडळाचे दोन कार्यकर्ते, मृदुंगाच्या तालावर भक्तीत दंग होऊन भजन म्हणणारे भजनी मंडळ, ढोल-ताशाच्या नादावर शिस्तबद्धपणे लेझीम खेळणारे नगरवासी आणि मिरवणूकीची शान असणारे २४ महिलांचे लेझीम पथक तसेच १० महिलांचे झांज पथक असे स्वरूप या मिरवणूकीचे होते.

बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही डोंबिवलीकरांसाठी एक मानबिंदू

गेली ६९ वर्षे कार्यरत असणाऱ्या टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचा यंदा ७० वा गणेशोत्सव संपन्न झाला. अनेक क्षेत्रात आपल्या आयोजन कौशल्यामुळे आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे प्रसिद्ध असलेल्या मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक ही डोंबिवलीकरांसाठी एक मानबिंदू आहे. आज बदललेल्या विसर्जन मिरवणूकीच्या काळातही गुलाल विरहीत, फटाके अथवा डिजे यांचा वापर न करता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि आपल्या परंपरा जपत मिरवणूक साजरी करणारी फार कमी मंडळे अस्तित्वात आहेत. किंबहूना पालखीतून श्रींचे विसर्जन करणारी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मंडळे मुंबईत शिल्लक आहेत.

महिला पथकाचे नेत्रदीपक असं सादरीकरण 

मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीचा लौकीक आणि शोभा द्विगूणीत करते ते मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या एक महिन्यांपासून सराव करून बसविलेले महिलांचे लेझीम आणि झांज पथक. गेली १० वर्षे मंडळ लेझीम/झांज पथक बसविते आहे. यंदा ११ व्या वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्या चैत्राली भावे यांनी या पथकाचे प्रतिनिधीत्व केलं. डोंबिवलीत राहणाऱ्या २४ महिला या पथकात होत्या. आपले घर, नोकरी सांभाळून गेला महिनाभर सराव करून या महिलांनी काल पथकाचे नेत्रदिपक सादरीकरण केलं. यामध्ये विविध प्रकारच्या लेझीम प्रकारांचा समावेश तर १० महिलांचा झांज प्रकाराचा समावेश होता. त्याचबरोबर महिलांनी थक्क करून टाकणारे रथ, कमळ आणि मंडळाचे ७० वे वर्ष असल्याने ‘७०’ संख्येचा आकार असं मानवी मनोरे देखील साकारले.मुसळधार पडत असलेल्या पावसाची आणि पायाखाली असलेले असंख्य खड्डे आणि बोचणारी रेती, दगड यांची परवा न करता या महिलांनी पथकाचे संपुर्ण मिरवणूकीत मोठ्या उत्साहाने सादरीकरण केलं.

नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहानं साकारली मिरवणूक 

आपल्या परंपरांचे जतन करण्याचा मंडळाचा कायमच प्रयत्न असतो. त्यामुळेच आज लोप पावत चाललेल्या अशा प्रकारच्या विसर्जन मिरवणुकीचे आम्ही आयोजन करतो असे मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसातही नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहानं मिरवणूक साकारली. रस्त्यांच्या झालेल्या खड्डेमय दयनीय अवस्थेबाबत अनेक नागरिकांनी मिरवणूकी दरम्यान प्रशासनाच्या निकृष्ठ दर्जाच्या रस्त्याच्या कामाबद्दल आणि भोंगळ कारभाराबद्दल खेद व्यक्त केली.

First Published on: September 13, 2019 6:47 PM
Exit mobile version