कोविड विशेष रुग्णालयाच्या अधीक्षकांची बदली, 4 नर्स कार्यमुक्त

कोविड विशेष रुग्णालयाच्या अधीक्षकांची बदली, 4 नर्स कार्यमुक्त

ठाण्यतील रस्ते सफाईच्या ऑनलाईन निविदांनाच वारंवार मुदतवाढ का?; कॉंग्रेसचा सवाल

महापालिकेच्या ग्लोबल हब येथील 1000 बेडच्या रुग्णालयातील गोंधळ प्रकरणी भाजपने केलेल्या तक्रारींची महापालिका आयुक्तांनी दखल घेतली आहे. कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश शर्मा यांची बदली करण्यात आली असून, चार नर्सना कार्यमुक्त करण्यात आले आहे. यापुढे रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांच्या मनगटावर टॅग लावण्याबरोबरच, चेहरा दिसेल अशा बॉडी बॅग खरेदी करण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

महापालिकेच्या ग्लोबल हब येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या भालचंद्र गायकवाड यांना बेपत्ता दाखविण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृतदेह जनार्दन सोनावणे यांच्या कुटुंबियांना देण्यात आला, तर सोनावणे यांच्यावर मोरे नावाने उपचार सुरू होते. या गोंधळामुळे गायकवाड व सोनावणे कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला होता. या परिस्थितीची गंभीर दखल घेत भाजपाचे ठाणे प्रभारी किरीट सोमय्या व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे दाद मागितली होती. भाजपाच्या या पाठपुराव्याची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेत गुरुवारी सायंकाळी कारवाई केली.

कोविड विशेष रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश शर्मा यांची मूळ पदावर राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकपदावर बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नर्स पूजा सावंत, जीरा धनका, रवीना आणि कामिनी भोईर यांना रुग्णालयाच्या सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच यापुढील काळात चेहरा दिसेल, अशा पारदर्शक बॉडी बॅग खरेदी करण्याबरोबरच रुग्णांच्या मनगटावर टॅग बांधण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

महापालिकेचे उपायुक्त (आरोग्य) विश्वनाथ केळकर यांची बैठक व्यवस्था हॉस्पिटलमध्ये करण्याचा महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोविड हॉस्पिटलच्या कारभारात सुधारणा होण्याची अपेक्षा महापालिका वर्तुळात व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या कारवाईचे भाजपा नेते किरीट सोमय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी स्वागत केले आहे.

First Published on: July 10, 2020 6:45 AM
Exit mobile version