वसई-विरार महापालिकेतील अधिकार्‍यांच्या बदल्या

वसई-विरार महापालिकेतील अधिकार्‍यांच्या बदल्या

Vasai Virar Municipal Corporation

वसई-विरार महापालिकेतील काही अधिकार्‍यांच्या बदल्या करतानाच काही अधिकार्‍यांना अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2019 रोजी आयुक्त बी. जी. पवार यांनी आपल्या निवृत्तीच्याच दिवशी या बदल्या झाल्याने त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

बदली झालेल्या आणि अतिरिक्त कार्यभार सोपवलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांमध्ये मेधा वर्तक, प्रेमसिंग जाधव, राजेश घरत, मिलिंद पाटील, वसंत मुकणे, अंबादास सरवदे, दीपाली ठाकूर, विकास पाडवी, प्रशांत चौधरी आणि सुरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. वरिष्ठ लिपीक असलेल्या मेधा पाटील प्रभाग समिती ‘आय’चा प्रभारी लेखापाल आहेत. त्यांच्याकडे आता प्रभाग समिती ‘आय’च्या प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. उपअधीक्षक असलेले प्रेमसिंग जाधव अभिलेख कक्षाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त आहेत. त्यांची वर्णी निवडणूक व जनगणना व स्थायी समिती सभापती यांचे स्वीय सहाय्यक, प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून लागली आहे.

उपअधीक्षक राजेश घरत महिला व बालकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त होते. ते आता प्रभाग समिती ‘एफ’ धानीव पेल्हारचे प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. वसंत मुकणे आरोग्य विभागाचे वरिष्ठ निरीक्षक असून, त्यांच्याकडे चंदनसार प्रभाग समिती ‘सी’चा कारभार होता. आता ते प्रभाग समिती ‘सी’चे प्रभारी सहाय्यक आयुक्त (आरोग्य) व चंदनसार विभागाचे अतिरिक्त कामकाज पाहणार आहेत. वरिष्ठ लिपीक असलेले अंबादास सरवदे आतापर्यंत प्रभाग समिती ‘सी’चे प्रभारी साहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहत होते. त्यांची बदली नालासोपारा प्रभाग ‘ई’मध्ये प्रभारी उपअधीक्षक म्हणून झाली आहे. त्यामुळे ते जन्म-मृत्यू , विवाह नोंदणी, आरोग्य विभाग आदी कामकाज सांभाळतील.

लिपीक-टंकलेखक असलेल्या दीपाली ठाकूर प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून प्रभाग समिती ‘एफ’मध्ये पेल्हार व धानिव हा भाग पाहत होत्या. आता त्यांचे बस्तान प्रभाग समिती ‘एच’ नवघर-माणिकपूरमध्ये महिला व बालकल्याण विभागात हलवण्यात आले आहे. लिपिक असलेले विकास पाडवी यांच्याकडे प्रभाग समिती ‘आय’चा प्रभारी सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार होता. ते आता प्रभाग समिती ‘बी’मध्ये अतिक्रमण विभाग सांभाळतील. वालीवचे प्रभारी सहाय्यक असलेले लिपिक प्रशांत चौधरी यांना मुख्यालयातील लेखा विभागात पाठवण्यात आले आहे. निवडणूक व जनगणना विभागात प्रभारी सहाय्यक आयुक्तपदी असलेले उपअधीक्षक सुरेंद्र पाटील आता प्रभाग समिती ‘जी’ वालीवचे प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून कारभार पाहतील.

First Published on: January 6, 2020 5:08 AM
Exit mobile version