‘तर राज्य सोडून द्या’, शिवसेनेच्या मंत्र्याचा अमृता फडणवीसांना टोला

‘तर राज्य सोडून द्या’, शिवसेनेच्या मंत्र्याचा अमृता फडणवीसांना टोला

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून सरकार आणि विरोधक यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरु झाले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे सुशांतसिंह प्रकरणावर भाष्य करताना मुंबई आता राहण्यालायक राहिले नसल्याचे म्हटले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी संताप व्यक्त केला. “मागचे पाच वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते, त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले होते. आज त्यांची खुर्ची गेल्यानंतर त्यांना मुंबई पोलीस कार्यक्षम वाटत नाहीत का? असं काय झालंय की अमृता फडणवीस यांना असुरक्षित वाटतंय. जर त्यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी राज्य सोडून निघून जावे”, अशी टीका अनिल परब यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केली.

अमृता फडणवीस यांनी ३ ऑगस्ट रोजी #JusticeforSushantSingRajput हा हॅशटॅग वापरून ट्विट केले होते. ज्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुंबई पोलिसांवर टीका केली होती. मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना ज्या पद्धतीने वागणूक दिली होती त्यावरुन उद्विग्न होत त्यांनी मुंबईत माणूसकी राहिली नसल्याचे म्हटले होते. तसेच आता इथे राहणे सुरक्षित नसल्याचे देखील त्यांनी नमूद केले होते. या ट्विटनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून देखील सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांच्याविरोधात मोहिम चालविण्यात आली होती.

परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्रकार परिषदेत या विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता परब यांनी संताप व्यक्त केला. मागच्या पाच वर्षात फडणवीस पोलिसांचे सरंक्षण घेऊन फिरत होते. आताही त्यांना पोलिसांचे सरंक्षण दिले जात आहे. जर त्या पोलिसांवर त्यांना अविश्वास असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडून जावे, असा सल्लाच परब यांनी दिला.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, ही विरोधकांची मागणीच अजब असल्याचेही परब म्हणाले. बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण सुरु आहे. मागच्या पाच वर्षात किती आत्महत्यांचा तपास तुम्ही सीबीआयकडे दिला, त्याचा तपशील आम्हाला द्या. जर दिला नसेल तर याच प्रकरणात ही मागणी का केली जात आहे? असेही प्रश्न परब यांनी उपस्थित केले.

First Published on: August 4, 2020 5:24 PM
Exit mobile version