कोस्टल रोडवरचा प्रवास ‘टोल फ्री’

कोस्टल रोडवरचा प्रवास ‘टोल फ्री’

Costal road

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा ड्रिमप्रोजेक्ट समजला जाणार्‍या मुंबईच्या कोस्टल रोडचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कोस्टल रोडवरून कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन करत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मनसेला टोला हाणला. दरम्यान, मुंबईच्या कोस्टल रोडवर कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाणार नाही, अशी घोषणादेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

मुंबईकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोस्टल रोडबाबत असलेल्या सार्‍या शंका दूर करूनच प्रकल्प पुढे जाईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी महापालिका आयुक्त अजोय मेहता, महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसह इतर पदाधिकारी हजर होते.

कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यावरून सेना-भाजपमध्ये द्वंद्व निर्माण झाले आहे. या प्रकल्पाचे श्रेय घेण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी सेनेने महानगरपालिकेच्या वतीने या प्रकल्पाचे भूमिपूजन उरकून घेतले. यामुळे या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते. कोस्टल रोडसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मुंबई महापालिकेला वेळेत प्राप्त झाल्याचे सांगताना या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण केले जाईल, असे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांनी भूमिपुत्रांना भकास करून विकास करणार नाही, असे आश्वासन कोळी बांधवांना दिले. मुंबईची पारदर्शकता जगाने पाहिली असल्याचे सांगताना उद्धव ठाकरे यांनी भाजपलाही जोरदार टोला हाणला.

संजय मुखर्जी यांचा असाही सन्मान
कोस्टल रोडची सर्व प्रक्रिया तत्कालिन पालिका उपायुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी पार पाडली होती. परंतु त्यांची बदली होऊन त्यांच्या रिक्त जागी संजय सेठी यांची नियुक्ती झाली आहे. मुखर्जी यांची बदली झाल्यानंतरही रविवारी झालेल्या कोस्टल रोडच्या भूमिपूजन सोहळ्यात त्यांना खास निमंत्रित करुन महापालिकेने त्यांचा सन्मान केला.

First Published on: December 17, 2018 5:30 AM
Exit mobile version