दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या १७८ रुग्णांवर उपचार, १२६ जणांवर यशस्वी उपचार

दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या १७८ रुग्णांवर उपचार, १२६ जणांवर यशस्वी उपचार

परळच्या टाटा रुग्णालयात कर्करोगाचे निदान करण्यासाठी आलेल्या अनेक रुग्णांची आणि त्यांची नातेवाईकांचे लॉक-डाऊनच्या काळात मोठे हाल झाले. त्यातच कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले. परंतु मुंबई महापालिकेने टाटा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या कर्करोग रुग्णांना कोरोनाची बाधा होताच त्यांना वरळीतील एनएससीआय डोम कोरोना केंद्रात हलवले. आतापर्यंत याठिकाणी कर्करोग आणि कोरोना या दोन्ही आजारांशी झुंजणाऱ्या १७८ रुग्णांना दाखल करण्यात आले असून त्यातील १२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मुंबई महानगरपालिकेने वरळी येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्लब ऑफ इंडिया येथे विकसित केलेल्या डोम कोरोना काळजी केंद्रात कर्करुग्णांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मुंबईत परळ स्थित विश्वविख्यात टाटा स्मृती कर्करोग उपचार रुग्णालयात देशभरातून विविध कर्करोगांनी ग्रस्त नागरिक उपचारांसाठी येतात. कर्करुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती स्वाभाविकच खालावलेली असते. त्यात कोरोनाचीदेखील लागण झाल्यास त्यांच्या जीविताला धोका पोहोचू नये, यासाठी महापालिकेने टाटा रुग्णालयाला मदतीचा हात दिला आहे. तेथील कोविड बाधित कर्करुग्णांना डोम कोरोना केंद्रामध्ये आणून उपचार केले जात आहेत.

टाटा रुग्णालयातून डोम कोरोना केंद्रामध्ये आलेल्या कोविड बाधित कर्करुग्णांमध्ये अवघ्या २ वर्ष वयाच्या चिमुरड्यापासून ते ७७ वर्ष वयापर्यंतच्या वृद्ध रुग्णाचा समावेश आहे. देशातील जवळपास सर्व भागातून आलेल्या रुग्णांसह एक विदेशी नागरिकही त्यात आहे. दाखल रुग्णांपैकी बहुतांश हे ५० वर्ष वयावरील आहेत. आतापर्यंत एकूण १७८ कोरोना बाधित कर्करुग्ण डोम कोरोना केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल झाले. पैकी १२६ जणांना यशस्वी उपचार देऊन, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. यामध्ये एका विदेशी नागरिकाचाही समावेश आहे. तर ५२ जणांवर उपचार सुरु आहेत. यातील लक्षणीय बाब अशी की, यातील एकही रुग्ण सुदैवाने दगावला नसून ही अत्यंत दुर्मिळ बाब ठरली आहे. दरम्यान, कोविड बाधित कर्करुग्णांच्या नातेवाईकांचा विचार करता, डोम कोरोना केंद्रामध्ये १० नातेवाईकांवर देखील यशस्वी उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले असून ४ नातेवाईकांवर सध्या उपचार सुरु आहेत.

एकीकडे जगातील विविध देशात कोरोना केंद्रांमध्ये कोविड बाधित कर्करुग्णांच्या प्राणांना धोका पोहोचत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या एनएससीआय कोरोना केंद्रातील ही कामगिरी वाखाणण्यासारखी ठरली आहे. संपूर्ण जगाला कोविड १९ कोरोना विषाणूच्या संसर्गाने जेरीस आणले आहे. या विषाणूचा सामना करताना विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ती खालावते, त्यांना प्राणांतिक धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार याची खबरदारी बृहन्मुंबई महानगरपालिका घेत आहे. मागील २० दिवसांत मुंबईमध्ये कोविड बाधित एकाही डायलिसिस रुग्णाचा मृत्यू झालेला नाही कारण अशा रुग्णांसाठी महानगरपालिकेने स्वतंत्र केंद्र, स्वतंत्र संयंत्रे नेमून दिलेली असून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता कर्करुग्णांच्या बाबतीतही विशेष खबरदारी घेतली जात आहे.

First Published on: June 12, 2020 8:45 PM
Exit mobile version