घरावर कोसळले झाड; दैव बलवत्तर म्हणून कुटुंब वाचले…

घरावर कोसळले झाड; दैव बलवत्तर म्हणून कुटुंब वाचले…

एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावातील एका घरावर चिंचेचे मोठे झाड कोसळल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. घरात कुटूंबातील तिघेजण अडकून पडल्यानंतर स्थानिकांनी या घरातील रहिवाशांना मोठ्या प्रयत्नांती बाहेर काढले. या घटनेत रोशन जाधव हा तरुण जखमी झाला आहे. ऐन पावसात त्यांच्यावर आपत्ती ओढवल्याने जाधव कुटूंब उघड्यावर आले आहे. संपूर्ण घर कोसळले, पण दैव बलवत्तर म्हणून कुटूंब बचावले.. अशी भावना कुटूंबप्रमुख भारत जाधव यांनी आपलं महानगरशी बोलताना व्यक्त केली.

उंबर्डे गावात राहणारे भारत जाधव हे हे पत्नी व तीन मुलांसह राहतात. सोमवारी सकाळच्या सुमारास त्यांच्या घराशेजारील जुने चिंचेचे झाड अचानक त्यांच्या घरावर कोसळले. यावेळी ते दुकानावर गेले होते. तर त्यांचा मोठा मुलगा सूरज हा कामावर गेला होता. त्यामुळे घरात त्यांची पत्नी गीता, मुलगी वृषाली आणि मुलगा रोशन हे तिघेजण होते.

भिंतीमुळे मुलगा बचावला
अचानक घरावर झाड कोसळल्याने जाधव कुटूंबिय घाबरून गेले. घरामध्ये आईसह दोघे मुले अडकून पडली होती. मोठा आवाज झाल्याने आरडाओरड ऐकू आल्याने आजूबाजूचे लोक धावून आले. शेजार्‍यानी व गावकर्‍यांनी धाव घेऊन तिघांनाही सुखरूपपणे बाहेर काढले. या तिघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र ज्या बाजूला झाड कोसळले त्याच भिंतीच्या शेजारी रोशन हा झोपला होता. झाड भिंतीवर पडल्याने ते अडले गेले त्यामुळे सुदैवाने रोशन बचावला.
त्याच्या डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या डोक्याचे सीटी स्कॅन करण्यात आले आहे. अशी माहिती भारत जाधव यांनी दिली. भारत जाधव हे टेलरिंगचे काम करतात. घर कोसळल्याने घरातील संपूर्ण सामानाचीही नासधूस झाली आहे. त्यामुळे केवळ अंगावरील कपडेच उरले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. हा प्रकार समजल्यानंतर पालिेकेच्या अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच तलाठी कार्यालयाने पंचनामा केला आहेे. त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी. अशी मागणी जाधव कुटूंबियांकडून होत आहे.
——————

First Published on: August 21, 2018 3:30 AM
Exit mobile version