‘रिपब्लिक टीव्ही’ने टीआरपी वाढविण्यासाठी दिले १ कोटी!

‘रिपब्लिक टीव्ही’ने टीआरपी वाढविण्यासाठी दिले १ कोटी!

फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महा मूव्ही चॅनेल्सची ३२ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली.

टीआरपी घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण झाल्याचे समोर आले आहे. ‘रिपिब्लक टीव्ही’ वाहिनीचा टीआरपी कृत्रिमरित्या वाढविण्यासाठी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत एक कोटींहून अधिक पैसे स्वीकारले. यातील काही रक्कम हवालाच्या माध्यमातून मिळाली अशी माहिती अटक केलेल्या एका आरोपीने दिली, असा दावा गुन्हे शाखेने केला आहे. ही माहिती गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दंडाधिकारी न्यायालयासमोर सादर केली आहे.

पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी अभिषेक कोळवडे याने ‘रिपब्लिक टीव्ही’ (Republic TV) वाहिनीचा टीआरपी वाढविण्यासाठी दरमहा १५ लाख रुपये मिळत. यापैकी काही रक्कम वाहिन्यांचा वितरक आशिष चौधरी याच्या क्रिस्टल ब्रॉडकास्ट कंपनीच्या कार्यालयात स्वीकारली, तर काही रक्कम हवालाच्या माध्यमातून मिळाली, अशी माहिती दिली. आरोपीने यातील काही रक्कम टीआरपी मोजण्यासाठी बॅरोमिटर यंत्र बसविलेल्या ग्राहकांना फितवण्यासाठी साथीदारांमध्ये वाटली. तर काही रक्कम स्वत:कडे ठेवली. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिसांनी अभिषेकच्या घराची आणि आशिष चौधरी याच्या कार्यालयाची झडती घेतली. या झडतीत ११ लाख ७२ हजार रुपये अभिषेकच्या घरातून तर दोन लाख रुपये आशिषच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले.

दरम्यान, टीआरपी घोटाळा (TRP Scam) प्रकरणातील प्रमुख आरोपीने वकिलांमार्फत माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे गुन्हे शाखेने सांगितले. ही बाब गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयाला सांगितली असून याबाबत योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणीही केली. माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या आरोपीने अटक केल्यानंतर आतापर्यंतच्या तपासास पूर्णपणे सहकार्य केले आहे. आरोपी माफीचे साक्षीदार झाल्यास पोलिसांना इतर आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्यास मदत होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

First Published on: November 3, 2020 8:56 AM
Exit mobile version