अतिसाराचे बालमृत्यू टाळण्यासाठी दरवर्षी २० लाख मोफत लस

अतिसाराचे बालमृत्यू टाळण्यासाठी दरवर्षी २० लाख मोफत लस

vaccination

अतिसारामुळे होणार्‍या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यासाठी कसारा या आदिवासी भागाची निवड या राज्यस्तरीय लसीकरणासाठी करण्यात आली. राज्यातील एक वर्षापर्यंतच्या सुमारे २० लाख बालकांना दरवर्षी मोफत लस देण्यात येणार असून राज्य शासनाच्या नियमित लसीकरणात त्याचा समावेश करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

रोटा व्हायरसमुळे होणार्‍या अतिसाराचा धोका बालकांमध्ये वयाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये अधिक आढळून येतो. अतिसारामुळे दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ४० टक्के बालके ही रोटा व्हायरसने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. अतिसाराचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आजपासून महाराष्ट्रात ह्या लसीचा समावेश नियमित लसीकरणात करण्यात आला आहे. त्यानुसार ३४ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सुमारे १ लाख ८६ हजार अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सध्या राज्याला ४ लाख ४० हजार लसींचे डोस आणि त्यासाठी लागणारे साहित्य पुरविण्यात आले आहे. ही लस खासगी वैद्यकीय अधिकार्‍यांकडून देण्यात येत होती. मात्र त्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येत असल्याने शासनाच्या आरोग्य केंद्रातून आता ही लस आजपासून मोफत दिली जाणार आहे. एक वर्षापर्यंतच्या बालकाला त्याच्या वयाच्या सहा, दहा आणि चौदाव्या आठवड्यात अशी तीनदा देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या भरण्याची मोहीम सुरू आहे. एमबीबीएस आणि विशेषज्ज्ञांची ८९० पदे भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे दुर्गम आणि आदिवासी भागात काम करणार्‍या बीएएमएस डॉक्टरांना कायम करण्यात आले आहे. आरोग्य विभागात मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

First Published on: July 22, 2019 4:32 AM
Exit mobile version