फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना अटक

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना अटक

प्रातिनीधीक फोटो

फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या दोन मुख्य आरोपींना गुरुवारी माहीम पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. या दोघांच्या अटकेने या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. आरोपींकडून गुन्ह्यातील कारसहीत साडेपंधरा लाख रुपयांची कॅश जप्त करण्यात आली, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, अटकेनंतर या आरोपींना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गणेश रमेश जाधव (42) हे दादर येथील आगारबाजार, एस.के. रोडवरील शिवशक्ती अपार्टमेंटमध्ये राहतात. शनिवारी 1 सप्टेंबरला ते काही कामानिमित्त माहीम येथील रहेजा रुग्णालयासमोरील नागोरी हॉटेलजवळ आले होते. यावेळी त्यांच्या परिचित आणि पूर्वी एकत्र कामाला असलेल्या आरोपीने त्यांना स्वस्त दरात सोन्याची बिस्कीटे देण्याचे आमिष दाखवले. त्यातून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. स्वस्तात सोन्याची बिस्कीटे मिळत असल्याने त्यांनी ती खरेदी करण्याची तयारी दाखवली.दोन किलो सोन्याच्या बिस्कीटांच्या मोबदल्यात त्यांना 24 लाख 50 हजार रुपये दिले होते. मात्र पाचही आरोपी सोन्याची बिस्कीटे घेऊन येतो, असे सांगून निघून गेले. ते परत आलेच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गणेश जाधव यांनी माहीम पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली. पाचही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यांच्या अटकेचे गुन्हे शाखेला आदेश दिले होते. पाच आरोपींपैकी बहादूर शेख, फैजान शेख आणि आसिफ तुर्के या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर गुरुवारी इतर दोन वॉण्टेड आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून शेवरोलेट एंजॉय कार आणि 15 लाख 58 हजार रुपयांची कॅश पोलिसांनी जप्त केली आहे.

First Published on: September 8, 2018 2:29 AM
Exit mobile version