शिवसेनेच्या उपविभागप्रमुखावर गोळीबारप्रकरणी दोघांना अटक

शिवसेनेच्या उपविभागप्रमुखावर गोळीबारप्रकरणी दोघांना अटक

बोगस डॉक्टर स्वप्ना पाटकरला अटक

विक्रोळी येथे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर केशव जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मध्यप्रदेशासह ठाण्यातून दोन आरोपींना बुधवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. कृष्णधर शिवनाथ सिंग ऊर्फ के. डी सिंग ऊर्फ शिवम आणि आनंद नरहरी फडतरे अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत सागर मनोज मिश्रा ऊर्फ अभय विक्रम सिंग याला पोलिसांनी अटक केली होती. यातील शिवम आणि मनोज हे दोघेही मध्यप्रदेश तर आनंद हा ठाण्याचा रहिवाशी आहे. प्रसाद पुजारीच्या आदेशावरुन हा गोळीबार झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून मुंबई शहरात पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रसादचा प्रयत्न असल्याचे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले.

चंद्रशेखर केशव जाधव हे बांधकाम व्यावसयिक असून शिवसेनेचे उपविभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 19 डिसेंबरला ते साईमंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ते त्यांचा मुलगा दर्शन व दोन मित्रांसोबत इगतपुरी येथे जाणार होते. काही वेळात तिथे एक तरुण आला आणि त्याने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यातील एक गोळी चंद्रशेखर जाधव यांच्या उजव्या हाताच्या दंडातून आरपार केली होती. या गोळीबारानंतर स्थानिक रहिवाशांनी गोळीबार करणार्‍या सागर मिश्रा या तरुणाला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.

सागर हा मूळचा मध्यप्रदेशचा रहिवाशी असून त्याला प्रसाद पुजारीने चंद्रशेखर यांच्यावर गोळीबार करण्याची सुपारी दिली होती. या गुन्ह्याचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर पंजाब येथील रहिवाशी बलदेव सिंग यांच्या मालकीची होती. बलदेव सिंग हे सीआरपीएफमधून 2011 रोजी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या चौकशीत सागर मनोज मिश्रा आणि अजय मनोज मिश्रा यांची नावे समोर आली. सागर मिश्रा याने बलदेव सिंग यांची रिव्हॉल्वर चोरली. त्यानंतर सागर मिश्राकडून मग ती रिव्हॉल्वर के. डी. सिंगने चोरल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यांत के. डी. सिंग याचा सहभाग उघडकीस येताच त्याला दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

के. डी. सिंगच्या तपासात प्रसाद पुजारीनेच चंद्रशेखर यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचे उघड झाले. त्याने त्यांची कोपरीसह भांडुप येथील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. यावेळी त्याने चोरी केलेले रिव्हॉल्व्हर मध्य प्रदेशातून आणले होते. या दोघांच्या संपर्कात आनंद होता. त्याला या कटाची माहिती होती, त्यामुळे त्याला मंगळवारी सायंकाळी ठाणे येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर के. डी सिंग आणि आनंद फडतरे या दोघांनाही बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. प्रसाद पुजारी सध्या विदेशात राहून टोळीचे सूत्र हलवित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: December 26, 2019 7:05 AM
Exit mobile version