गोळीबार करून दोघा भावांचे अपहरण

गोळीबार करून दोघा भावांचे अपहरण

अपहरण

उधार घेतलेले दोन लाख रुपये परत न केल्याचा राग मनात धरून दोघा भावांचे अपहरण करत त्यांना बेदम मारहाण करून गोळी झाडत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. यातील मंगेश नावाचा इसम जखमी झाला असून, त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तानाजी काठे (38, रा. डोंबिवली) याच्यासह विनय अय्यर, संजय आणि अन्य एकाविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विनयला अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

शनिवारी सायंकाळी 7 च्या सुमारास मंगेश शेलार (25, रा. दत्तनगर) इमारतीच्या आवारात उभा असताना तानाजीसह त्याचे साथीदार मोटारीने याठिकाणी आले. त्यांनी मंगेशला जबरदस्तीने मोटारीत बसवत खंबाळपाडा परिसरात नेले. याठिकाणी उधारी दिलेल्या दोन लाख रुपयांची मागणी मंगेशकडे केली. पैसे परत केले नाही तर, फार्महाऊसवर नेऊन गोळी घालण्याची धमकी तानाजीने मंगेशला दिली. या घटनेमुळे घाबरलेल्या मंगेशने त्याचा मावस भाऊ सोमनाथ देवकर याला संबंधित प्रकाराची माहिती देत याठिकाणी बोलावले. सोमनाथ त्याठिकाणी आल्यानंतर दोघांनाही चौघांनी मिळून जबर मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या दोघांना पुन्हा मोटारीत बसवून मुरबाड येथील सरळगाव परिसरात असलेल्या एका फार्महाऊसवर नेण्यात आले.

फार्महाऊसवर गेल्यावर दोघांकडे पैशांची मागणी करत पुन्हा मारहाण करण्यात आली. यावेळी, सोमनाथला येथील स्विमिंगपूलमध्ये देखील बुडविण्यात आले. यासर्व प्रकारामुळे घाबरलेल्या दोघांनी पैसे देण्याची कबुली दिली. त्याचवेळी, तानाजीने स्वत:कडील बंदुकीने सोमनाथच्या दिशेने गोळी झाडत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जखमी झालेल्या मंगेशवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

First Published on: April 18, 2019 4:15 AM
Exit mobile version