आठवड्यातून दोन दिवस शिक्षकांना उपस्थिती बंधनकारक

आठवड्यातून दोन दिवस शिक्षकांना उपस्थिती बंधनकारक

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनाचा वाढता प्रभाव आणि लॉकडाऊनची परिस्थिती यामुळे शिक्षकांना 30 जूनपर्यंत वर्क फ्रॉम होमचे आदेश शिक्षण विभागाने दिल्यानंतर आता शिक्षकांना आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. शिक्षकांना शाळेत बोलवण्याचा निर्णय हा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुरुप घ्यायचा आहे. याबाबतचा अध्यादेश शिक्षण विभागाने जारी केला आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्हयातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक सेवांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेमध्ये उपस्थित राहण्यामध्ये अडचणी येत आहेत. ही बाब विचारात घेता शिक्षकांसाठी वर्क फ्रॉम होमची सवलत दिली असली तरी शाळा सुरू करण्याची तयारी व ई लर्निंगबाबत मुख्याध्यापकांना बोलवल्यास त्यांना आठवडयातून दोन दिवस शाळेत उपस्थित रहावे लागणार  आहे. त्याचप्रमाणे शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब हृदयविकार आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या शिक्षकांना शाळेत बोलविण्यात येणार नसून जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत त्यांना वर्क फ्रॉम होम या पद्धतीने कामे देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांची शाळेमध्ये उपस्थिती अत्यावश्यक असेल अशा शिक्षकांना शाळेमध्ये बोलवण्याबाबत मुख्याध्यापकांनी किंवा शाळा व्यवस्थापन समितीने परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. शिक्षकांना शक्यतो आठवड्यामध्ये एक किंवा दोन दिवसापेक्षा जास्त वेळा बोलवू नये तसेच एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावू नये असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

ज्या शाळा कोरोनाच्या विलगीकरण कक्षामध्ये रूपांतर करण्यात आले आहे अशा शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत शिक्षकांना शाळेत बोलाविण्यात येणार नाही. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीशिवाय क्षेत्रीय अधिकार्‍यांना शिक्षकांना कोणतेही निर्देश देता येणार नाही. विद्यार्थी पट कमी झाल्याने मुख्य शाळेतून अन्य आस्थापनेवर पाठविण्यात आलेल्या अतिरीक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत बोलावून ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी त्यांची मदत घ्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

रेल्वे सेवा ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याचे कळते. मुंबईत काम करणारे शिक्षक हे ठाणे, कल्याण, वसई, विरारला राहत असल्याने ते शाळेत पोहचू शकत नाही. त्यामुळे याचा फेरविचार शासनाने करावा. शिक्षकाना आठवड्यात एक किवा दोन दिवस शाळेत कसे जाता येईल. शाळेजवळ राहणारे शिक्षकांना शक्य होईल. त्यांच्यावर हा अन्याय आहे.
– राजेश पंड्या, उपाध्यक्ष, टीडीएफ

कोरोना ड्युटीपासून शिक्षकांची मुक्तता

राज्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाचे सर्वेक्षण आणि इतर विविध जबाबदार्‍या देण्यात आल्या आहेत. शिक्षकांना या जबाबदारीमधून मुक्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिक शिक्षणाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍याशी संपर्क साधून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोरोना ड्युटी असणार्‍या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे

आठवड्यातून एक दिवस शाळेत उपस्थित राहून इतर दिवशी घरूनच वर्क फ्रॉम करण्याचे आदेश शिक्षण उपसचिवांनी काढले असले तरी एक दिवस शाळेत कसे जावे व कशासाठी जावे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत शिक्षकांना वर्क फ्रॉम होमच करू द्यावे.
-अनिल बोरनारे, संयोजक, मुंबई भाजपा शिक्षक सेल

First Published on: June 26, 2020 8:10 PM
Exit mobile version