वरळी येथे निर्माणाधीन इमारतीमध्ये दुर्घटना; दोघांचा मृत्यू

वरळी येथे निर्माणाधीन इमारतीमध्ये दुर्घटना; दोघांचा मृत्यू

मुंबईः वरळी नाका येथे ‘फोर सिझन रेसिडेन्सी’ या तळमजला अधिक ४२ मजली इमारतीचे बांधकाम सुरू असताना मंगळवारी रात्रीच्या सुमारास दगड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, वरळी नाका, गांधी नगर येथे फोर सिझन हॉटेलनजीक निर्माणाधीन तळमजला अधिक ४२ मजली ‘फोर सिझन रेसिडेन्सी’ या इमारतीच्या ४२ व्या मजल्यावरून मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दगड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत दोन व्यक्तींचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. साबीर अली (३६) आणि इम्रान अली (३०) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचा पंचनामा केला. दोन्ही मृतदेह नायर रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. ही दुर्घटना नेमकी का व कशी काय घडली याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.सदर इमारतीचे बांधकाम चालू असताना संबंधित बिल्डरने सुरक्षिततेबाबत योग्य ती उपाययोजना न केल्यानेच दुर्घटना घडून त्यात दोघांचा मृत्यू झाला, अशी चर्चा परिसरात सुरू होती.

गेल्या महिन्यात वरळी येथे १५ मजली ‘अविघ्न टॉवरमध्ये ‘लिफ्ट ट्रॉली’ अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ कामगारांचा मृत्यू झाला होता. वरळी, बी.जी.खेर मार्ग, प्रेम नगर येथे निर्माणाधिन १५ मजली ‘अविघ्न टॉवर’ मध्ये इमारतीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी कामगारांनी वापरलेली ‘ट्रॉली लिफ्ट’ अचानक कोसळली होती. लिफ्ट ट्रॉलीवर काम करत असलेले दोघे जण सोळाव्या मजल्यावरून लिफ्टसह खाली कोसळले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी दोघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारदर सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला होता.

तसेच रविवारी, १२ फेब्रुवारीला खिंडीपाडा येथे एका व्यावसायिक गाळ्यामध्ये दुरुस्ती कामाच्या अंतर्गत नव्याने बांधलेल्या पोटमाळ्याचे बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेत राजकुमार राम सहाय (२१) आणि रामवतार अर्जुन यादव (१८) या दोन कामगारांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी पहाटेच्या सुमारास कामगार झोपेत असताना घडली. या दुर्घटनेत बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे समजते.

भांडुप ( पश्चिम), डंकलाईन रोड, दर्गा रोड कब्रस्तान, क्रांती मिटर मंडळ, साईबाबा मंदिराजवळ डोंगराळ भागात एका व्यावसायिक बंद गाळ्याचे दुरुस्तीचे काम सुरू होते. शनिवारी सदर गाळ्यात पोटमाळ्याचे बांधकाम करण्यात आले. त्यासाठी लोखंडी चॅनलवर लाद्या टाकून रेती, सिमेंटचा स्लॅब टाकण्यात आला होता. सदर बांधकाम ओले होते. त्याच स्लॅबवर ठेकेदाराच्या कामगारांनी रेतीचा साठा व विटा रचून ठेवल्या होत्या. हे बांधकाम अचानक कोसळले व दोन कामगारांचा मृत्यू झाला.

First Published on: February 14, 2023 11:08 PM
Exit mobile version