तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या दोन मुलींची सुटका

तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या दोन मुलींची सुटका

अपहरणाचा प्रातिनिधिक फोटो

मुंबई : तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात अखेर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना यश आले आहे. या दोन्ही मुलींचा ताबा त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आला आहे. अपहरणाच्या याच गुन्ह्यात शाकीर रहिम शेख या २४ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याचा ताबा वडाळा टी. टी. पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. शाकीरने या दोन्ही मुलींचे अपहरण का केले, त्यांना मुंबईतून पनवेल येथील एका रुममध्ये का कोंडून ठेवले याचा उलघडा होऊ शकला नाही. या दोन्ही मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्यांच्यावर लैगिंक अत्याचार झाला आहे की नाही याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

दिवा परिसरातून अपहरण

गुरुवारी 20 सप्टेंबरला सोळा आणि सतरा वयोगटातील दोन मुलींचे शीव-कोळीवाडा परिसरातून अपहरण झाले होते. या दोन्ही मुली दिवा परिसरात राहत असून काही कामानिमित्त शीव-कोळीवाडा परिसरात आल्या होत्या. त्या दोघीही रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी त्यांच्या मिसिंगची तक्रार वडाळा टी. टी. पोलिसांत केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

पनवेलमधून सुटका

या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करीत होते. हा तपास सुरु असतानाच तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने पनवेलच्या शिरधोन गावात सापळा लावून एका रुममधून दोन्ही मुलींची सुटका केली. त्यांच्या चौकशीत शाकीर रहिम शेख याचे नाव समोर आले होते, त्यानंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, चौकशीत त्यानेच या दोन्ही मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यांत अटक केली.

अपहरणाचे कारण गुलदस्त्यात

अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी वडाळा टी टी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. पोलीस तपासात शाकीर हा विवाहीत असून तो सध्या शीव-कोळीवाडा येथील इस्कॉन हायस्कूलजवळील म्हाडा कॅम्प परिसरात राहतो. या अपहरणामागील कारण मात्र समजू शकले नाही, त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अपहरणामागील कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान दोन्ही मुलींचा ताबा त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आला आहे.

First Published on: September 26, 2018 1:30 AM
Exit mobile version