भिवंडीत मेंढीच्या कुर्बानीच्या पावतीवरून दोन गटात तुंबळ हाणामारी

भिवंडीत मेंढीच्या कुर्बानीच्या पावतीवरून दोन गटात तुंबळ हाणामारी

भिवंडी शहरातील गैबीनगर भागात रविवारी रात्री मेंढीच्या कुर्बानीनिमित्त पावती फाडण्यावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी दोन्ही गटातील एकूण सात जणांवर वेगवेगळे दोन गुन्हे दाखल केले आहेत. या सातही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मारहाणीमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा – पूरग्रस्तांना मदत न करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना मनसेचा धोबीपछाड

काय आहे नेमके प्रकरण?

बकरी ईद सणानिमित्ताने साद अन्सारी, कासीम अंसारी हे आपल्या मित्रांसोबत गैबीनगरच्या जुबेदा अपार्टमेंट येथील कुर्बानी सेंटरवर पावती फाडण्यासाठी आले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सरफराज तैमूर अंसारी, तन्वीर तफज्जूल अंसारी, शमिक इनामुल अंसारी, मुदतसीर अंसारी यांनी आपल्या साथीदारांसह साद अंसारी, सरफराज बाबा, फारुकी वल्ली आदींशी वाद घालून कुर्बानीच्या पावतीचा जुना हिशोब मागितला. यावेळी मोठा वाद निर्माण होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत लोखंडी कैची आणि लाकडी दांड्यांचा वापर केला गेला. दरम्यान, साद आणि त्याचे साथीदार या मारहाणीत गंभीर जखमी झाले असून त्यांना स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी साद याच्या फिर्यादीवरून सरफराज, तन्वीर, शमिक, मुदस्सीरसह अन्य दोन-तीन अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. तर शमिक इजमुल्ला अन्सारी यांनी देखील या मारहाणीची फिर्याद दिल्याने पोलिसांनी साद अंसारी, सरफराज बाबा, फारूक वल्ली यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ममता डिसूझा करीत आहेत.

First Published on: August 12, 2019 9:05 PM
Exit mobile version