पुरंदर हादरले, २४ तासांत भूकंपाचे २ सौम्य धक्के

पुरंदर हादरले, २४ तासांत भूकंपाचे २ सौम्य धक्के

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात मंगळवारी ( दि. २६) रोजी सायंकाळी साडे सात आणि आज ( बुधवारी) सकाळी ११.३० वाजता असे २४ तासांत भूकंपाचे दोन धक्के बसले आहेत. मंगळवारी रात्री २.७ रीश्टर स्केलचा धक्का जाणवल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आल्याचे पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले. पुण्यातील या भूकंपांमुळे कोणतीही जिवितहानी झाली असल्याची माहिती मिळालेली नाही. पुण्यातील पुरंदरे तालुक्यातील सोनोरी, वनपुरी, दिवे गाव आणि परिसरातील गावात भूकंपाचे धक्के बसले आहेत.

पुरंदरमधील दिवे, सोनोरी आणि परिसरात भूकंपाचे हादरे बसताना स्फोट आल्यासारखा आवाजा झाला. यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडत सुरक्षित स्थळी धाव घेत होते. या परिसरात कोणतीही जिवितहानी किंवा आर्थिक नुकसान झाले नाही. परंतु भूकंपग्रस्त परिसरात घर, घरांचे पत्रे आणि भाड्यांमध्ये कंपने जाणवले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

आज दुपारी बसलेला भूकंपाचा धक्का अत्यंत सौम्य असल्याने त्याची नोंद होऊ शकली नाही. मात्र लोकांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी, असे आवाहन रूपाली सरनोबत यांनी केले. पुरंदर तालुक्यातील सोनोरी, वनपुरी आणि ढूमेवाडी या गावांत दोन वेळा भूकंपाचा धक्का बसल्याचे येथील प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. परंतु भुकंपाच्या धक्क्यांमुळे पुण्यात दिव्यापासून ते सासवडपर्यंतचा वीजपुरवठा दीड तास खंडित झाला होता.

First Published on: January 27, 2021 9:46 PM
Exit mobile version