दोन महिन्यांच्या बाळाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका

दोन महिन्यांच्या बाळाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका

अपहरण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स स्थानकातून एका दोन महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला काल, रविवारी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट एकने नाशिक येथून अटक केली. निलम बोरा (वय ३५) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिने बाळाचे अपहरण का केले होते. याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

सीएसएमटी रेल्वे स्थानकात २९ मार्चला एका दोन महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे स्थानक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट एकनेही याप्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. गुन्हे अन्वेषण शाखा युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सीएसएमटी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने तपासले. तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते.

तपासादरम्यान, ही महिला नाशिक शहरात असल्याची माहिती युनीट एकला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नाशिक येथील पंचवटी भागात सापळा रचून तिला रविवारी अटक केली. तसेच तिच्याकडून अपहरण केलेले दोन महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका करून ते बाळ रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. तिने यापूर्वी आणखी किती मुलांचे अपहरण केले होते. याचा पोलीस तपास करत असल्याची माहिती दीपक देवराज यांनी दिली.

First Published on: April 15, 2019 6:36 PM
Exit mobile version