दोन अपघातात वयोवृद्धासह दोघांचा मृत्यू

दोन अपघातात वयोवृद्धासह दोघांचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

मुंबई : वरळी आणि चुन्नाभट्टी येथील दोन अपघातात एका वयोवृद्धासह दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही मृतांची ओळख पटली नसून त्यांची ओळख पटावी यासाठी आता पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. याप्रकरणी वरळी आणि चुन्नाभट्टी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन एका चालकाला अटक केली तर अपघातानंतर पळून गेलेल्या दुसर्‍या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

गुरुवारी रात्री सव्वाबारा वाजता 35 वर्षांचा एक व्यक्ती चुन्नाभट्टी येथील ट्रॉम्बे-शीव रोडवरील एव्हरार्डनगर परिसरातून रस्ता क्रॉस करीत होता. यावेळी भरवेगात जाणार्‍या एका अज्ञात वाहनचालकाने त्याला धडक दिली होती. या अपघातात हा व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघातानंतर वाहनचालक तेथून पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच चुन्नाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेपूर्वी वरळी येथील दुसर्‍या अपघातात एका 65 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. हा वयोवृद्ध मंगळवारी रात्री पावणेदहा वाजता वाजता वरळीतील एमटीएनएलसमोरील पांडुरंग बुधकर मार्गावरुन जात होता. यावेळी आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील बसने त्याला धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर घटनास्थळी गेलेल्या वरळी पोलिसांनी बसचालकास अटक केली.

First Published on: September 15, 2018 2:15 AM
Exit mobile version