तीन महिन्यांपासून दोन हजार आदिवासी धान्याला वंचित

तीन महिन्यांपासून दोन हजार आदिवासी धान्याला वंचित

राज्यात शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव धान्य दुकानात नियमित धान्य उपलब्ध करण्याचे व ते प्रत्येकाला मिळेल अशी शासन यंत्रणा राबवित असतानाही पुरवठा विभागीय काम अपूर्ण राहिल्याने त्याचा फटका तालुक्यातील तब्बल २ हजार आदिवासी कुटुंबियांना तीन महिने धान्य मिळू शकले नाही .

तालुक्यातील राऊत पाडा येथील कातकरी समाजातील ७५ वर्षीय निराधार वयोवृद्ध वाघे सुंदरी चैत्य या महिलेस शिधावाटप दुकानात त्या वयोवृद्ध महिलेच्या अंगठ्याच्या ठसे पॉस मशीनवर उमटत नसल्याने दुकानदार धान्य देण्यास मनाई करीत असल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

भिवंडी तालुका पुरवठा विभागात आदिवासी कातकरी समाजाच्या कुटुंबियांना अंत्योदय शिधापत्रिका मंजूर करून घेतली एवढेच नव्हे तर त्या तयार करण्यासाठी पुरवठा विभागात मनुष्यबळ कमी असल्याने काही स्थानिक कार्यकर्त्यांनी सुमारे चारशे कार्ड तयार करून दिले. परंतु पुरवठा विभागाने ते कार्ड ऑनलाईन प्रणालीशी न जोडताच सही शिक्के मारून त्या कुटुंबियांना वितरीत केल्याने व त्यासोबत सुमारे पंधराशे कार्ड धारकांची ऑनलाईन नोंद न झाल्याने मागील तीन महिन्यांपासून हे सर्व कुटुंबीय धान्य मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत.

याबाबत तालुका पुरवठा अधिकारी पी. डी. चव्हाण यांच्या दालनात आदिवासी व कातकरी बांधव जाऊन जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त सर्व आदिवासी स्त्री पुरुषांनी कार्यालयात घुसत गोंधळ घातला व आजच्या आज सर्व शिधापत्रिका धारकांना धान्य मिळण्याची व्यवस्था कार्यान्वित करावी अन्यथा शिधापत्रिकांची होळी केली जाईल, असा सज्जड इशारा दिला.

First Published on: March 2, 2021 4:00 AM
Exit mobile version