करावेगावातून २ टन प्लास्टिक जप्त; २५ हजारांचा दंड वसूल

करावेगावातून २ टन प्लास्टिक जप्त; २५ हजारांचा दंड वसूल

करावेगावातून तब्बल २ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले

नवी मुंबई शहर ‘प्लास्टिकमुक्त’ व्हावे या करीता सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांचे प्रबोधन व प्रतिबंधात्मक प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. अशाप्रकारे बेलापूर विभागातील करावेगावात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तब्बल २ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. परिमंडळ १ चे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त तुषार पवार यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहेत.

मे. भदारिया डेटर्स व इतर यांच्यावरील कारवाईत २ टनपेक्षा अधिक प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तसेच २५ हजार रुपये दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली.

नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळावा

मार्च महिन्यात होळी उत्सवापासून ‘प्रतिबंधात्मक प्लास्टिक’चे साठे तसेच किरकोळ प्लास्टिक पिशव्या विक्री या विरोधात सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर केल्यास प्लास्टिक पिशव्यांचा वापर न झाल्याने नवी मुंबई शहर ‘प्लास्टिक मुक्त’ होण्यास मदत होईल. तरी नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार तसेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने करण्यात येत आहे.

First Published on: June 18, 2019 8:12 PM
Exit mobile version