फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन फरार आरोपींना अटक

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन फरार आरोपींना अटक

प्रातिनिधिक फोटो

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील दोन फरार आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. किरण लक्ष्मणदास शहा आणि राहुल ईश्वर कपूर आहेत. यातील राहुल कपूर हा व्यापारी तर किरण शहा हा तक्रारदाराचा सीए असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर किरणला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस तर राहुल कपूरला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोघांनी गुंतवणुकीच्या नावाने एक कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तक्रारदार व्यावसायिक असून त्यांची अंधेरी येथे एक खाजगी कंपनी आहे. त्यांच्याकडे किरणसह अन्य एक तरुण सीए म्हणून काम पाहतात. त्यांच्यावर त्यांनी सर्व कंपनीतील आर्थिक व्यवहाराची जबाबदारी सोपवली आहे. काही वर्षांपूर्वी किरणने राहुल कपूरशी तक्रारदारांशी ओळख करुन दिली होती.

आरोपीविरोधात तक्रार दाखल

राहुलची एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगला फायदा होईल, या कंपनीत अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. एक वर्षांनंतर त्यांना २५ टक्के फायद्यासह मुद्दल रक्कम मिळाली आहे अशी बतावणी करुन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने राहुलच्या कंपनीच्या नावाने एक कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी नफ्याची रक्कम दिली नाही किंवा गुंतवणुक केलेल्या रक्कमेबाबत टोलवाटोलवी करण्यास सुरुवात केली होती. राहुलकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांत फसवणुकीची तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच गुरुवारी राहुल कपूरला पोलिसांनी अटक केली.

आरोपींना न्यायालयासमोर हजर केले

पोलीस कोठडीत असताना त्याने या गुन्ह्यांत किरण शहा याचा सहभाग असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर मंगळवार, ६ नोव्हेंबर रोजी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

First Published on: November 7, 2018 10:23 PM
Exit mobile version