उबरमध्ये प्रवासी महिलेला मारहाण

उबरमध्ये प्रवासी महिलेला मारहाण

उष्णोता पॉल

रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीला कंटाळून शहरांमधील नागरिकांनी अॅपबेस टॅक्सीने प्रवास करणे सुरु केले. परंतु अॅपबेस टॅक्सीचे भाडे अनेकांना परवडत नाही, त्यामुळे अॅपबेस टॅक्सी वापरणाऱ्यांसाठी टॅक्सी शेअर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. त्यामध्ये ओला कंपनीने ओलाशेअर आणि उबर कंपनीने उबरपूल ही सुविधा प्रवाशांसाठी दिली. या सुविधेमुळे टॅक्सीचे भाडे शेअर करता येत असल्याने अनेकांनी अॅपबेस टॅक्सीचा वापर सुरु केला. परंतु उबरने प्रवास करणाऱ्या एका महिलेला या सुविधेचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले आहे. सोमवारी मुंबईच्या लोअर परळ परिसरात राहणाऱ्या एका महिलेला उबरमधील सहप्रवासी महिलेने मारहाण केली आहे. मारहाणीत ही महीला जबर जखमी झाली आहे. जखमी महिलेने घटनेची माहिती ट्विटरवर शेअर केली असून उबर कंपनीला ट्विटरवर टॅग करून कंपनीचे या घटनेकडे लक्ष वेधले आहे. तसेच तिने लोअर परळ पोलीस ठाण्यात सदर महिलेविरोधात तक्रार केली आहे.

केस तोडले, चेहरा ओरबाडला

उष्णोता पॉल असे पिडीत महिलेचे नाव असून ती मुंबई स्थित पत्रकार आहे. ‘आपण सर्वाधिक पैसे देत असूनही आपल्यालाच सर्वात उशीरा घरी ड्रॉप केले जाणार, हे कारण देत आरोपी महिलेने उबरचालकाशी वाद घालायला सुरुवात केली. त्यावर उष्णोताने चालकाची बाजू घेतल्याने रागवलेल्या महिलेने मारहाण केल्याचे उष्णोताने ट्विटरवर म्हटले आहे. या मारहाणीत उष्णोताच्या डोक्याला जबर मार लागला असून रक्तस्त्राव झाला असल्याचे तिने अपलोड केलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे. आरोपी महिलेने उष्णोताचे केस तोडले. तसेच चेहऱ्यावरही मार दिला आहे.

सहकार्य करण्यास उबरचा नकार

पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी उष्णोताला आरोपी महिलेची माहिती हवी होती. त्यासाठी तिने उबर इंडियाशी संपर्क साधून त्या महिलेची माहिती मागितली, परंतु उबर इंडियाने माहिती देण्यास नकार दिला आहे. कस्टमर पॉलिसी अंतर्गत प्रवाशांची माहिती देता येणार नसल्याचे उबरचे म्हणणे आहे. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. उबर इंडिया किमान पोलिसांशी तरी सहकार्य करेल, अशी अपेक्षा उष्णोताने व्यक्त केली आहे.

First Published on: June 25, 2018 7:21 PM
Exit mobile version