कोस्टल रोड वाद पेटणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आमने-सामने

कोस्टल रोड वाद पेटणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आमने-सामने

कोस्टल रोडच्या प्रकल्पावरुन शिवसेना आणि मनसे आमने-सामने

शिवसेनेने प्रतिष्ठेचा केलेला आणि मुंबई महापालिकेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून कोस्टर रोडकडे पाहिले जात होते. आज दुपारी ४ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते भूमिपूजन होणार आहे. वरळीतील कोळी बांधवानी मात्र या कोस्टल रोडला विरोध केलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्याला भेट देत स्थानिक जनतेचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेतले. “आडमुठेपणा करत कोस्टल रोड लादला जाऊ नये, स्थानिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे. अन्यथा संघर्ष अटळ आहे.”, असा इशाराच राज ठाकरे यांनी आज दिला. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे.

कोस्टल रोडला उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले. मात्र या प्रोजेक्टमुळे मासेमारीचा व्यवसाय अडचणीत येऊ शकतो, तसेच पर्यावरणाचेही अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी भीती स्थानिक कोळी बांधवांनी व्यक्त केली आहे. यामुळेच राज ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या भूमीपूजनाआधीच कोळीवाडा गाठत स्थानिकांशी संवाद साधला. तसेच पुढील काही दिवसात मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांना स्थानिकांचे मुद्दे समजवून सांगणार असल्याची माहिती कळत आहे.

मूळनिवासींच्या पोटावर पाय देऊ नका

मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक यांनी संदिप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या आजच्या भेटीबद्दल माहिती देताना सांगितले की, कोळी बांधव हे मुंबईचे मुळनिवासी आहेत. त्यांच्या पोटावर पाय देऊन कुठलाही प्रकल्प होता कामा नये? प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र स्थानिकांना डावलून कोणताही प्रकल्प होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. अन्यथा राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे संघर्ष अटल आहे.

First Published on: December 16, 2018 9:30 AM
Exit mobile version