“प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन….” राम नवमीच्या दिवशी उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

“प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन….” राम नवमीच्या दिवशी उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

राज्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाची सातत्याने कारवाई सुरू आहे. तपास यंत्रणांच्या याच कारवाईला विरोध करण्यासाठी युवा परिवर्तन की आवाज या संघटनेने महाभारत यात्रा काढली. रामटेकपासून ते मातोश्री अशी ही यात्रा काढून तरूणांना उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी रामनवमीचं औचित्य साधत एकनाथ शिंदेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय.

“सत्तेत सध्या दगड बसले आहेत. राजकारणात प्रभू रामाचे नाव घेवून दगड तरंगत आहेत; पण त्या दगडांना पाण्यावर तरंगण्यासाठी ठेवले नाही. त्या दगडावर पाय देऊन लंका जिंकणे हेच आपला उद्देश आहे. काही काळाकरीता धनुष्यबाण जरी त्यांनी (शिंदे गटाने) मिळवला तरीही प्रभू राम माझ्यासोबत आहेत”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

यापुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणीतरी एखाद्यासाठी एवढ्या किलोमीटरपर्यंत पायपीट करत येणं अशक्य आहे. मातोश्रीवर येऊन तुम्हाला माझ्यासोबत उभं राहावं वाटतं, याला मी रामाचा आशीर्वाद मानतो. राम सेतू बांधताना वानर सेना होतीच पण घार सुद्धा होती, तिच्यासारखाच प्रत्येकाने मी काय करू शकतो याचा विचार करायचा आहे. आपण सर्व एकत्र आलो तर लंका दहन करू शकतो. मग आपण एकत्र आलो तर लंकादहन का करू शकत नाही? तुम्ही रामटेकवरून निघालात आणि राम नवमीला इथे पोहोचलात, असं देखील यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

काही जणांनी धनुष्यबाण चोरला असला, तरी प्रभूराम माझ्यासोबत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. धनुष्यबाण जरी कागदावरचा नेला असला, तरी हे बाण माझ्या भात्यात आहेत. हे फक्त बाण नाहीत, तर हे ब्रह्मास्त्र आहेत. हे सगळे ब्रह्मास्र माझ्याबरोबर आहेत, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

First Published on: March 30, 2023 5:20 PM
Exit mobile version