अन्यायावर वार करण्याची हिंमत मराठी माणसाने दाखवली, मार्मिकच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकेरींनी साधला संवाद

अन्यायावर वार करण्याची हिंमत मराठी माणसाने दाखवली, मार्मिकच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकेरींनी साधला संवाद

मराठी माणसावर तो आळशी असल्याचा,व्यवसायात मागे असल्याचा आरोप करण्यात येतो.पण जेव्हा केव्हा मराठी माणसावर,महाराष्ट्रावर अन्याय होतो तेव्हा मात्र त्या अन्यायावर वार करण्याची हिंमत मराठी माणसाने कायम दाखवली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच ती शिकवण आहे. मी देखील तीच शिकवण घेऊन पुढे चाललो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केले.

साप्ताहिक मार्मिकच्या वर्धापनदिनानिमित्त आज सोशल मिडियाद्वारे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना मार्मिक ही मराठी माणसाच्या स्वाभिमानाची मशाल आहे, अशा शब्दात त्यांनी मार्मिकचे महत्व विशद केले.

शिवसेनाप्रमुखांनी मार्मिकची स्थापना केली.मार्मिकमुळे शिवसेनेची स्थापना झाली.एका व्यंग्यचित्रकाराने व्यंगचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून राजकीय पक्ष स्थापन केल्याचे हे एकमेव उदाहरण असावे.सुरुवातीला लोकांचे मनोरंजन करणे हा एकमेव उद्देश होता. पण मराठी माणसावर जेव्हा परप्रांतीयांचे आक्रमण झाले तेव्हा मार्मिकच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांनी चळवळ उभी केली.पुढे शिवसेनेचा जन्म झाला. अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण शिवसेनाप्रमुखांनी दिली.तीच शिकवण घेऊन मी पुढे चाललो आहे.माझ्यावर मुख्यमंत्रिपदाची अनपेक्षित जबाबदारी आली.आता कितीही संकटे आली तरी मी पळ काढणार नाही.रडायचे नाही लढायचे हीच शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आता कॅमेराही हातात घेऊ शकत नाही मार्मिक आणि माझे वय एकच आहे.मी पूर्वी मार्मिक मध्ये व्यंगचित्रे काढायचो.फोटोग्राफी हा तर माझा आवडता छंद आहेच.पण मुख्यमंत्री झाल्यानंतर ब्रश-पेन्सिल तर सोडाच पण कॅमेरा पण हातात धरता येत नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.


हेही वाचा – १२ आमदारांचा प्रस्ताव राज्यपालांना दीर्घकाळ प्रलंबित ठेवता येणार नाही – हायकोर्ट

First Published on: August 13, 2021 8:48 PM
Exit mobile version