मनसेच्या आंदोलनाची उल्हासनगरच्या महापौरांना धास्ती

मनसेच्या आंदोलनाची उल्हासनगरच्या महापौरांना धास्ती

उल्हासनगर महापालिका

उल्हासनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘मला मराठी येत नाही, तुम्ही सिंधीतून बोला’, असे वक्तव्य करणार्‍या महापौर पंचम कलानी सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. हा मराठी भाषेचा अवमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया मनसेने दिली असून महापौरांनी मराठी भाषा शिकून घ्यावी म्हणून बाराखडीचे पुस्तक, पाटी, खडू भेट देणार असल्याचे जाहीर केले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून महापौर पंचम कलानी महापालिकेमध्ये आल्या नसल्यामुळे त्यांनी मनसे कार्यकर्त्यांची धास्ती घेतली की काय, अशी चर्चा होत आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या १२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरुन भाजप नगरसेवक विजू पाटील यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. पाटील यांनी याबाबत महापौर पंचम कलानी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले. यावर मला मराठी येत नाही, सिंधी भाषेत बोला, असे महापौरांनी सांगितले. सभेत उपस्थित असलेल्या शिवसेना तसेच इतर पक्षातील मराठी नगरसेवकांनी याबाबत कोणताही आक्षेप नोंदवला नाही. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत त्वरित आपली प्रतिक्रिया देताना महापौर पंचम कलानी यांचे वक्तव्य मराठी भाषेचा अवमान करणारे असून त्यांना चोख उत्तर दिले जाईल, असे जाहीर केले.

मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, प्रदीप गोडसे, संजय घुगे, मुकेश सेठपलानी, सुभाष हटकर, दिनेश आहुजा, शैलेश पांडव, अक्षय धोत्रे यांनी महापौर पंचम कलानी यांच्या दालनात जाऊन त्यांनी मराठी भाषा शिकावी म्हणून बाराखडीचे पुस्तक, पाटी, खडू भेट देणार असल्याचे जाहीर केले.देशाची फाळणी झाल्यानंतर सिंधी बांधवांचे अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात पुनर्वसन केले गेले. त्यांना नागरिकत्व आणि सन्मानाची वागणूक मिळाली. परंतु अशाप्रकारे शहराच्या प्रथम नागरिक पंचम कलानी मराठीचा अवमान करतात हे खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया समाजसेवक मनोज कोरडे यांनी दिली.शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यासंबंधी सांगितले की, महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे, महापौरांना जर मराठी येत नसेल तर त्यांनी लवकरात लवकर मराठी शिकावी आणि या भाषेचा सन्मान करावा. पुन्हा असे वक्तव्य करू नये.

First Published on: December 28, 2018 5:15 AM
Exit mobile version