महिला व बालकल्याण समितीचा निधी पालिका आयुक्तांनी रोखला?

महिला व बालकल्याण समितीचा निधी पालिका आयुक्तांनी रोखला?

उल्हासनगर महानगर पालिका

उल्हासनगर मनपाच्या महिला बालकल्याण समितीला अंगणवाडी व बालवाडीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासाठी मिळणारा २० लाख ५३ हजारांचा निधी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी रोखला आहे. या संदर्भात निघणारी निविदा देखील रद्द करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

या प्रकरणी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन महिला बालकल्याणला मिळणारा निधी रद्द करावा, अशी मागणी केली होती. मनपा उपायुक्त विकास चव्हाण यांनी हा निधी रद्द करण्यात आल्याचे सांगितले.

केंद्र सरकारचा निधी मिळत असताना पालिकेचा निधी कशासाठी

उल्हासनगर शहरातील अंगणवाडी आणि बालवाडीतील मुलांना दप्तर, पाण्याची बाटली, जेवणाचा डबा इत्यादी साहित्य वाटप करण्यासाठी मनपाच्या महिला बालकल्याण समितीमार्फत २० लाख ५३ हजारांचा निधी मंजूर झाला होता. या संबंधी निविदादेखील मंजूर करण्यात आली होती. मात्र बालवाडी आणि अंगणवाडी हे केंद्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास अंतर्गत चालविण्यात येतात. त्यांना केंद्र सरकारचा निधी प्राप्त होत असताना मनपाकडून अतिरिक्त निधी देण्याची गरज काय? असा सवाल माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी उपस्थित केला. लहान मुलांच्या नावाने हा निधी मागितला जात असून त्यात मोठा गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याचा आरोप करून, ही निविदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती.

सदर निधी आम्ही बालकांना मदत करण्याच्या दृष्टीने मागितला होता. तसेच मनपाच्या माध्यमातून देखील बालवाडी आणि अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात येऊ शकते. हा निधी रद्द करण्याचा केवळ मौखिक आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली आहे. तरी हा निधी रद्द करण्यात येऊ नये अशी मागणी आयुक्तांकडे करणार आहोत.
छाया चक्रवर्ती, सभापती, महिला बालकल्याण समिती

First Published on: June 18, 2019 7:37 PM
Exit mobile version