भाजपकडून अनधिकृत ई-कार्डाची छपाई

भाजपकडून अनधिकृत ई-कार्डाची छपाई

ई-कार्डाची छपाई

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही पक्षाने सर्जिकल स्ट्राईक, हवाई दलाची प्रतिमा न वापरण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत मुंबईत भाजपकडून ई- कार्डाची छपाई सुरू असल्याचे प्रकरण मंगळवारी उघडकीस आले. हे इलेक्ट्रॉनिक कार्ड बनवण्याचे काम अवैधरित्या सुरू असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला. हे कार्ड बनवण्याकरता निवडणूक आयोगाची परवानगी नव्हती. प्रचाराकरता तयार करण्यात येत असलेल्या या ई-कार्डात सर्जिकल स्ट्राइक, हवाई दलाचे विमान तसेच भारतीय लष्काराची प्रतिमा वापरण्यात आल्याचे दिसून आले.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांसह खार उपनगरात युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीच्या मालकीच्या इमारतीमध्ये भेट दिली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी या कार्डाच्या एकूण किती प्रती छापण्यात आलेल्या आहेत, याची माहितीही समोर आली नाही. या प्रकरणी बोलताना काँग्रेसचे सचिन सावंत म्हणाले की, भाजपच्या कृष्णकृत्यांवर यातून प्रकाश पडला आहे.‘मै भी चौकीदार’म्हणणारे चोर आहेत हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. करोडो रुपयांचे अशा प्रकारचे प्रचारसाहित्य निवडणूक आयोगाच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकून वापरण्याचा भाजपचा मानस असल्याचे स्पष्ट दिसून येते.

युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीच्या मालकाने स्वतःची जागा या गैरकृत्याकरता दिली होती आणि त्यांच्याच सांगण्यावरून हे काम सुरु होते हे स्पष्ट आहे आणि या मालकाचे भाजपच्या नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे या संदर्भात आचारसंहितेचा भंग, तसेच पैशाचा गैरवापर व जनतेचा विश्वासघात करण्यात आलेला आहे. या कंपनीच्या बॉक्समध्येच हे कार्ड पाठवण्यात येणार होती. निवडणूक अधिकारी व खार पोलीस यांच्यासमोरच भाजपची ही कृष्णकृत्ये उघडकीस आल्याने तात्काळ भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि युनायटेड फॉस्फरस लिमिटेड कंपनीचे मालक या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्षातर्फे सावंत यांनी यावेळी केली.

असे आहे ई-कार्ड
या ई-कार्डात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इलेक्ट्रॉनिक संदेश रेकॉर्डच्या स्वरुपात आहे. कार्ड उघताच तो जनतेला ऐकू जावा असे हे कार्ड आहे. निवडणूक आयोगाने ही सर्व कार्ड जप्त केली असून त्यांची किंमत ६ कोटी रुपयांपर्यंत आहे. प्रत्येक कार्ड ३०० रुपयांचे आहे.

First Published on: April 10, 2019 4:15 AM
Exit mobile version