‘शोधगंगा’मध्ये प्रबंध अपलोड करण्यास विद्यापीठे अनुत्सूक

‘शोधगंगा’मध्ये प्रबंध अपलोड करण्यास विद्यापीठे अनुत्सूक

विविध विद्यापीठांमधून पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांचे शोधप्रबंध हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘शोधगंगा’ या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. मात्र राज्यातील सर्वच विद्यापीठे या संकेतस्थळावर प्रबंध अपलोड करण्यास अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

देशात संशोधनाला वाव मिळावा, नवनवीन संशोधन घडून यावे, संशोधकांना संशोधन करण्यास दिशा मिळावी, विद्यार्थ्यांना विविध संशोधन एकाच उपलब्ध व्हावे तसेच वाङ्मयचौर्य घडू नये यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने यासाठी ‘शोधगंगा’ व ‘शोधगंगोत्री’ हे प्रकल्प सुरू केले आहेत. विद्यापीठ आयोगाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रत्येक प्रबंध येथे अपलोड करणे बंधनकारक आहे. २०१० नंतर विविध विद्यापीठांनी ‘इन्फ्लिबनेट’सोबत सामंजस्य करार केला, परंतु प्रत्यक्षात काही विद्यापीठांनी पीएचडी प्राप्त उमेदवारांचे प्रबंध पाठवले नाहीत. यामुळे पीएचडी प्राप्त विद्यार्थी आणि संकेतस्थळावर अपलोड होणारे प्रबंध यांच्यात तफावत दिसून येत आहे.

देशात प्रबंध अपलोड करण्यामध्ये मद्रास विद्यापीठ अव्वल असून या विद्यापीठाचे ‘शोधगंगा’वर सर्वाधिक १३ हजार ३१ प्रबंध आहेत. तर दुसरा क्रमांक हा सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा येतो. या विद्यापीठाचे तब्बल ११ हजार ३४१ प्रबंध आहेत. आतापर्यंत देशभरातील तीन लाख ३५ हजार ११० पीएचडी प्रबंध शोधगंगावर उपलब्ध आहेत. त्यात राज्यातील पारंपरिक विद्यापीठांचे २८ हजार ९६९ इतके प्रबंध यावर आहेत. तर देशातील जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मुंबई विद्यापीठाचे मात्र अवघे ५६४ प्रबंध या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. यामुळे हे प्रबंध अद्ययावत करण्याबाबत विद्यापीठ फारसे उत्सुक नसल्याचे चित्र असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शोधगंगावर अपलोड प्रबंधांची संख्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ११,३४१
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ : ५,२३५
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ : ४,४९०
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर : ४,२७८
एसएनडीटी महिला विद्यापीठ : १,१५९
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ : १,०३४
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : ६०४
मुंबई विद्यापीठ : ५६४
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ : २०६
गोंडवाना विद्यापीठ : ५६
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ : २

First Published on: January 17, 2022 10:04 PM
Exit mobile version