विद्यापीठाचा बी.कॉमचा पेपर फुटला

विद्यापीठाचा बी.कॉमचा पेपर फुटला

मुंबई विद्यापीठ

भाईंदरमधील अभिनव परीक्षा केंद्रावर मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या बी.कॉम परीक्षेचा 5 एप्रिलला झालेला अर्थशास्त्राचा व 8 एप्रिलला एमएचआरएम विषयाचा पेपर फुटला. याप्रकरणी अलोक चतुर्वेदी, फरहान खान, शहानवाज मंसुरी या तिघा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी ज्या महाविद्यालयातून पेपर फुटले आहेत, त्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनाही जबाबदार धरून विद्यापीठाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही युवासेनेकडून करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाची बी.कॉमची परीक्षा सुरू असून 5 एप्रिलला अर्थशास्त्र विषयाचा पेपर होता. परीक्षा सुरू होण्याच्या 15 मिनिटे भाईंदरमधील अभिवन परीक्षा केंद्रावर महाविद्यालयाचे प्राध्यापक मयूर दामासिनिया हे स्वच्छतागृहात गेले असता अलोक चतुर्वेदी हा विद्यार्थी माबाईलमध्ये काहीतरी वाचत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आलोकचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये थोड्या वेळाने सुरू होणार्‍या पेपरची उत्तरे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी तेथे असलेल्या फरहान खान या विद्यार्थ्याचाही मोबाईल तपासला असता त्याच्याही मोबाईलमध्ये उत्तरे सापडली. परीक्षा सुरू झाल्यानंतर वर्गात शहानवाज मंसुरी याची हालचाल परीक्षक राजेश सोनावणे यांना संशयास्पद वाटली. त्यांनी त्याचे हॉलतिकिट तपासले असता त्याच्या पाठीमागे उत्तरे लिहिल्याचे सापडले. तिघा विद्यार्थ्यांकडे उत्तरे सापडल्याने पेपर फुटल्याची शंंका महाविद्यालयाचे प्राचार्य केशव परांजपे यांना आली. त्यामुळे त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

महाविद्यालयाच्या सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांवर गुन्हा
पेपर फुटीबाबत महाविद्यालयाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला असला तरी हे पेपर ज्या महाविद्यालयातून फुटले आहेत. त्या महाविद्यालतील प्राध्यापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी मुंबई विद्यापीठाची चूक नसली तरी ज्या महाविद्यालयातून पेपरफुटी प्रकरण घडले आहे त्या महाविद्यालयांच्या प्राध्यापकांसह गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत व राजन कोळंबेकर यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

First Published on: April 10, 2019 4:46 AM
Exit mobile version