महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर लोगोचा गैरवापर; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर लोगोचा गैरवापर; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा

महाराष्ट्र सायबर सेल

महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर लोगोचा गैरवापर केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कफ परेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करीत आहेत. महाराष्ट्र सायबरचे एक ट्विटर अकाऊंट आहे. या अकाऊंटमध्ये सायबर पोलिसांनी दैनंदिन प्रेस नोटसह सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृतीची माहिती प्रसिद्ध केली जाते.

तसेच या अकाऊंटच्या माध्यमातून पोलीस सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, बदनामी करणे तसेच समाजात तेढ निर्माण करणार्‍याविरुद्ध नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करते. काही दिवसांपूर्वीच एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र सायबरचा लोगोचा गैरवापर करुन दुसरे एक अकाऊंट तयार केले होते, हा प्रकार संबंधित पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती वरिष्ठांना सांगितली. परवानगी न घेता महाराष्ट्र सायबर लोगोचा गैरवापर केल्याचे उघडकीस येताच अखेर कफ परेड पोलीस ठाण्यात संबंधित अज्ञात व्यक्तीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

या गुन्ह्यांचा कफ परेड पोलिसांकडून तपास सुरु आहे. तसेच सायबर सेलकडून या गुन्ह्यांचा संमातर तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र सायबर लोगोचा गैरवापर करण्यामागे या व्यक्तीचा उद्देश काय होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

First Published on: July 9, 2020 8:44 PM
Exit mobile version