वेदरशेडचा वापर वाणिज्य वापरांसाठी

वेदरशेडचा वापर वाणिज्य वापरांसाठी

Weathershade

पावसाळ्यात होणार्‍या गळतीपासून बचाव करण्यासाठी अनेक इमारतींच्या गच्चीवर तसेच दुकानासमोर वेदरशेड उभारण्यात येतात. मात्र, त्यासाठी ठाणे महानगरपालिकेची रितसर परवानगी घेणे बंधनकारक असतानाही अनेकांनी परवानगी घेतलेली नसते. तसेच ज्या जागेचा वापर वाणिज्य वापराकरिता होत आहे. याठिकाणी वाणिज्य सामान ठेवले जाते किंवा इतर कामासाठी त्या जागेचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळेच या वेदरशेड्स काढण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र, दुकानासमोर असलेल्या वेदरशेडमुळे पादचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश प्रमाणात वाणिज्य वापराकरिता होत असलेल्या या जागांच्या वापरावर तत्काळ बंदी आणावी, तसेच वाणिज्य सामान ठेवण्यासाठी करत असलेल्या इमारतींना दंड आकारणी करून हे वेदरशेड हटवावेत, अशी मागणी होत आहे.

ठाणे महानगरपालिकेने सूचना दिल्यानंतरही वेदरशेड्स काढल्या नाहीत तर त्या महापालिकेच्या वतीने काढण्यात याव्यात आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांनी पैसे भरून फक्त पावसाळ्यात तात्पुरते वेदरशेड उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली आहे, त्या शेड्सही तत्काळ काढण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैसवाल यांनी संबंधित विभागाला दिले असतानाही याबाबत अद्यापि कोणतीही कारवाई झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेचे जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सोशल मीडियाद्वारे या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. परंतु, याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या ठाणे शहराचे विद्रुपीकरण काही थांबताना दिसत नाही.

महापालिकेची परवानगी न घेता पावसाळ्यापूर्वी इमारतींवर उभारण्यात आलेल्या वेदरशेड् तत्काळ काढण्यात यावेत. वेदरशेड्स काढण्यापूर्वी संबंधितांकडून मूळ रक्कम ५ हजार रुपये आणि दंडाची रक्कम ५ हजार रुपये, असे एकूण दहा हजार रुपये वसूल करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले आहेत.
– संजीव जैसवाल, आयुक्त, ठाणे महापालिका

मध्यमवर्गीय लोकांनी पावसाळ्यात होणार्‍या गळतीपासून बचाव करण्यासाठी या वेदरशेड उभारल्या होत्या. तसा ठरावही महासभेने मंजूर केला होता. राज्य शासनाकडे तो ठराव मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना वेदरशेड हटवण्याचा निर्णय चुकीचा आहे. वेदरशेड उभारल्यामुळे इमारती लवकर धोकादायक होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
– मिलिंद पाटणकर, नगरसेवक, ठाणे महापालिका

पावसाळ्यात जुन्या इमारतीच्या गच्चीवर पावसाचे पाणी साचून घरामध्ये गळती सुरू होते. तसेच अधिक गळतीमुळे इमारतींना धोका निर्माण होतो. हे टाळण्यासाठी अनेक गृहनिर्माण संस्था इमारतीच्या गच्चीवर शेड उभारतात. या गृहनिर्माण संस्था त्याचा वापर वाणिज्य वापरासाठी किंवा सामान ठेवण्यासाठी करत नाहीत. त्याचा उद्देश केवळ ऊन-पावसापासून इमारतीचे संरक्षण करणे हाच असतो. त्यामुळे वेदरशेडच्या विरोधात कारवाई करू नये, तसेच दंड आकारणी करू नये.
– नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठाणे महापालिका

First Published on: January 9, 2019 5:35 AM
Exit mobile version