परदेशात वापरलेले मास्क भिवंडीत

परदेशात वापरलेले मास्क भिवंडीत

जगभर करोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतात त्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर तोंडाला लावण्याच्या मास्कची मागणी वाढली आहे. भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर परदेशातून भंगार येत असून त्यामध्ये परदेशात वापरलेले मास्क सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या बाजारात मास्कचा तुटवडा असल्याने परदेशातून वापरलेले मास्क येथील गोदामात धुवून पुन्हा विक्रीसाठी आणण्याचा घाट गोदाम मालकाने घातला होता. त्याचा एक व्हिडिओ शनिवारी रात्री व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस व आरोग्य विभाग यंत्रणा खडबडून जागी झाली.

या व्हायरल व्हिडिओचा तपास ग्रामीण भागात करीत असताना स्थानिक नागरिकांनी संबंधित गोदाम हे वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंडमधील इमारतीमध्ये असल्याचे स्पष्ट झाले. परंतु त्या ठिकाणी रात्री कोणीही नसल्याने सकाळी पुन्हा त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी स्थानिक पंचायत समिती सदस्य विकास भोईर ग्रामस्थांसह बी १०८ या क्रमांकाच्या गोदामात गेले होते. तेव्हा तेथील कामगाराने हे मास्क पुर्णा ग्रामपंचायत हद्दीत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या पाईपलाईन शेजारील कचरा टाकण्याच्या जागेत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत आरोग्य विभागासह पोलीस यंत्रणेस माहिती दिली असून या संपूर्ण परिसरात भंगार साठवणुकीच्या गोदामांची पोलिसांनी कसून तपासणी करून नागरिकांवर येणारे संकट टाळावे, अशी मागणी भिवंडी पंचायत समिती सदस्य विकास भोईर यांनी केली आहे.

पाईपलाईन शेजारी हे वापरलेल्या मास्कचा भंगार माल फेकून दिल्याची माहिती समजताच आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने पावले उचलली. त्यानंतर घटनास्थळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, ग्राम विस्तार अधिकारी आर.बी. भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीष रेंघे, नारपोली पोलीस ठाण्यातील पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक के.आर. पाटील यांसह स्थानिक ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी धाव घेतली.

त्यावेळी या ठिकाणी या मास्कचा ढीग आढळून आला. या मुद्देमालावर कारवाई करायची कोणी? याबाबत बरीच खलबते झाल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नारपोली पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर हा मुद्देमाल नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश दिले असल्याची माहिती ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

हातरुमालही मास्कचे काम करू शकतो
ठाणे जिल्ह्यात करोना व्हायरसचा अजूनही शिरकाव झाला नसला तरी खबरदारी म्हणून आरोग्य विभाग तत्परतेने दक्ष असून नागरिकांनी घाबरून न जाता मास्क विकत घेताना ते नवे असल्याची खात्री करावी. याशिवाय हातरुमाल सुध्दा मास्कचे काम करूशकतो, असा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी दिला आहे.

First Published on: March 9, 2020 7:01 AM
Exit mobile version