किशोरवयीन मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू

किशोरवयीन मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू

शहरातील १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असून १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. याबाबत केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचे काम आरोग्य विभागाच्यावतीने सुरू करण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकतीच १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्या अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आवश्यक ते नियोजन सुरू करण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक तिसरा डोस घेण्यासाठी ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या गंभीर आजार असलेल्या वृद्धांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, दुसरा डोस घेतल्यानंतर ९ महिन्यांनंतर किंवा ३९ आठवड्यांनंतरच तिसरा डोस दिला जाणार आहे. लसीच्या दुसर्‍या डोसच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे मोजले जातील. हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या कोविनच्या माध्यमातून हा प्रतिबंधनात्मक डोस मिळेल. त्यांना हा डोस कधी देय आहे, याबद्दल जुन्या नोंदणीकृत नंबरवर एसएमएसद्वारे देखील सूचित करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन किंवा केंद्रात जाऊन नोंदणी करता येणार आहे.

१५ ते १८ वर्षांची मुले लसीकरणासाठी आपल्या आयडी कार्डवरून कोविन अ‍ॅपवर नोंदणी करू शकतात. २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व किशोरवयीन मुले या लसीकरणासाठी पात्र आहेत. ते ऑनलाइन किंवा केंद्रात जाऊन नोंदणी करू शकतात. ३ जानेवारीपासून सुरू होणार्‍या लसीकरणामध्ये (१५ ते १८ वर्षे) किशोरवयीन मुलांसाठी कोवॅक्सिन लसीचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.

सर्व नागरिकांना त्यांच्या उत्पन्नाची स्थिती विचारात न घेता सरकारकडून लसीकरण केंद्रावर मोफत कोविड-१९ लस देण्यात येत आहे. परंतु ज्यांच्याकडे पैसे देण्याची क्षमता आहे त्यांना खासगी रुग्णालयांच्या लसीकरण केंद्रांचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.

First Published on: December 29, 2021 5:30 AM
Exit mobile version