शाळा, महाविद्यालयांमध्ये सुरू होणार लसीकरण

शाळा, महाविद्यालयांमध्ये सुरू होणार लसीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला ३ जानेवारीपासून सुरुवात झाली. अवघ्या १० दिवसांमध्ये मुंबईतील १ लाखांहून अधिक मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा हा वेग वाढवण्यासाठी आता १५ ते १८ वयोगटातील या विद्यार्थ्यांचे थेट शाळा, महाविद्यालयांमध्येच लसीकरण करण्यात येणार आहे.

मुंबईत कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्यात ओमायक्रॉनची पडलेली भर यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या थेट २० हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले. अवघ्या १० दिवसांमध्ये मुंबईमध्ये १ लाख ८ हजार ३८० मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अधिकाधिक मुलांचे लसीकरण व्हावे यासाठी मुंबई महापालिकेने शाळा व महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे १५ ते १८ वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांचे अद्यापपर्यंत लसीकरण झाले नाही, त्यांना लवकरच शाळा व महाविद्यालयांमध्येच लसीचा डोस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी विद्यार्थ्यांची लसीकरण केंद्रावर जाऊन रांगा लावण्याची गरज पडणार नाही.

First Published on: January 14, 2022 8:28 PM
Exit mobile version