लसीकरण वर्षपूर्ती; राज्यात १४ कोटींपेक्षा अधिक डोसचे लाभार्थी

लसीकरण वर्षपूर्ती; राज्यात १४ कोटींपेक्षा अधिक डोसचे लाभार्थी

कोरोनाला रोखण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या लसीकरणाला गतवर्षी १६ जानेवारीला सुरुवात झाली. लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक महत्वाचे टप्पे पार करण्यात आले असले तरी वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल १४ कोटी ३१ लाख ५५ हजार ३२८ डोस देण्यात आले आहेत. यामध्ये पहिला डोस ८ कोटी ४७ लाख ५१ हजार ८३७ जणांनी घेतला तर दोन्ही डोस ५ कोटी ८० लाख ७७ हजार ७४४ जणांनी घेतले. त्याव्यतिरिक्त ३ लाख २५ हजार ७४७ जणांना बूस्टर डोस देण्यात आले आहेत.

१६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणास सुरुवात झाली. मात्र सुरुवातीला लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेला संभ्रम, लसींचा तुटवडा यामुळे लसीकरणाला काही धीमा प्रतिसाद मिळत होता. पण राज्य सरकारने केलेल्या जनजागृतीमुळे लसीकरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला. हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वर्षभरामध्ये राज्यामध्ये तब्बल ९२.७ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांची संख्या ८ कोटी ४७ लाख २९ हजार ५३ तर ५ कोटी ८० लाख ३७ हजार ३०४ लाभार्थींनी दोन्ही डोस घेतले आहेत. यामध्ये ११ लाख ७६ हजार ५५० हेल्थ वर्कर्सनी दोन्ही तर १ लाख ३५ हजार १८७ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. तसेच १९ लाख ७२ हजार २०९ फ्रंटलाईन वर्कर्सनी दोन्ही डोस घेतले असून १ लाख २ हजार १०४ जणांनी बूस्टर डोस घेतले आहेत. त्याचप्रमाणे ६० पेक्षा अधिक वय असलेल्या ९७ लाख ७८ हजार ८३० नागरिकांनी दोन्ही तर ८८ हजार ४५६ ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. तसेच ४५ ते ५९ वयोगटातील १ कोटी ३९ लाख ३८ हजार ३०७ तर १८ ते ४४ वयोगटातील ३ कोटी १२ लाख ११ हजार ८४८ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. विशेष म्हणजे पहिला डोस घेतल्यानंतर दुसर्‍या डोसची मुदत उलटून गेल्यानंतरही अनेकजण दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रामध्ये गेलेले नाहीत. त्यामुळे पहिला डोस घेतलेल्यांच्या तुलनेत दोन्ही डोस घेणार्‍यांची संख्या कमी दिसून येत आहे. तसेच मागील १२ दिवसात १५ ते १८ वर्षातील २५,१०,६३६ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी राज्य आरोग्य विभागाची दररोज १० हजारांपेक्षा अधिक लसीकरण केंद्र कार्यरत आहेत.

आरोग्य विभागाकडून चाचपणी

मुंबईत आतापर्यंत १११ टक्के लसींचा पहिला डोस व ९१ टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. बर्‍याच नागरिकांनी दुसरा डोस अन्य शहरात जाऊन घेतला आहे. तसेच कोविड अ‍ॅपवर माहिती अपुरी असल्याने अजूनही बर्‍याच नागरिकांनी दुसरा डोस घेतला नसल्याची माहिती दर्शवित आहे. पण याबाबत पालिका आरोग्य विभागाकडून चाचपणी सुरू असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले.

First Published on: January 17, 2022 9:57 PM
Exit mobile version