वसई रेल्वे पोलिसांचे हाल, प्रशासन मात्र उदासीन !

वसई रेल्वे पोलिसांचे हाल, प्रशासन मात्र उदासीन !

(रेल्वे पोलिसांना स्टेशनवर असलेल्या अशा पत्र्याच्या शेडमध्ये आश्रय घ्यावा लागतो.)

लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणार्‍या रेल्वे पोलिसांना मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर चोवीस तास ड्युटी करणार्‍या रेल्वे पोलिसांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे वसई रेल्वे पोलिसांचे मुख्यालय वसई रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर दूरवर आहे. त्याठिकाणी दैनंदिन कामासाठी पायपीट करावी लागते ती वेगळेच.

पश्चिम रेल्वेवर मीरारोड ते विरार ही सर्वाधिक गर्दीचीे रेल्वे स्थानके आहेत. या स्थानकातून दररोज लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. या प्रवाशांच्या सुरक्षेचा भार रेल्वे पोलिसांच्या खांद्यावर असतो. असे असतानाही मागील 20 वर्षापासून हे पोलीस कर्मचारी मूलभूत सेवांपासून वंचित आहेत. रेल्वे पोलिसांच्या ड्युट्या रेल्वे स्थानकावर लागतात. या कर्मचार्‍यांसाठी रेल्वे स्थानकात मागील 20 वर्षात साध्या पोलीस चौकी बांधण्यात आलेल्या नाहीत. त्यांना बसण्यासाठी जागा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, शौचालये नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचारी काम करत आहेत. शासकीय सेवेत असल्याने त्यांना तक्रार करण्याची मुभा नाही. यामुळे निमूटपणे त्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. या कर्मचार्‍यांना सुविधा मिळण्यासाठी प्रशासन काहीच कार्यवाही करताना दिसत नाही.

वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत मीरारोड, भाईंदर, नायगाव, वसई रोड, नालासोपारा, विरार आणि वैतरणा अशी 7 रेल्वे स्थानके येतात. त्यासाठी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये 137 पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये 34 महिला कर्मचारी आहेत. फक्त भाईंदर आणि विरार स्थानकात रेल्वे पोलिसांची अधिकृत चौकी आहे. इतर स्थानकात चक्क पत्र्याच्या शेडमध्ये कर्मचार्‍यांना बसावे लागते. तिथेच डबे खातात, आपला गणवेश बदलतात. या ठिकाणी त्यांना नैसर्गिक विधीसाठी, स्थानकातील प्रवाशांची शौचालये वापरावी लागतात. महिला कर्मचार्‍यांना तर अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यांना गणवेश बदलण्यासाठी चेंजिंग रूम नाहीत. शौचालये नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. रात्रीची ड्युटी संपल्यावर घरी जायची ट्रेन निघून गेल्यास फलाटावरच झोपावे लागते.

रेल्वे स्थानकात अनेक गुन्हे, अपघात होत असतात, यामुळे कर्मचार्‍यांना सदैव दक्ष राहावे लागते. सतत रेल्वे फलाटावर फेर्‍या माराव्या लागतात, अनेक वेळा अपघातात सापडलेले मृतदेह रुग्णवाहिका येईपर्यंत ताब्यात ठेवावे लागतात. अशावेळी चौकी नसल्याने रेल्वे स्थानकातच ठेवावे लागतात. यामुळे रेल्वे स्थानकात पोलीस चौकी असणे गरजेचे आहे. पण प्रशासन लक्ष देत नसल्याने या कर्मचार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या संबंधी रेल्वेशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. पण अजूनही कोणतीही दखल रेल्वेने घेतली नाही. लवकरच चर्चा होऊन यावर काही तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.
— यशवंत निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई रेल्वे

दुसर्‍याची सुरक्षा करणार्‍या पोलिसांसाठी शौचालय नाही. ऑफिस कामासाठी कपडे बदलण्यासाठी महिलांना रुम नाही. रात्री गाडी सुटली की पोलिसांना स्टेशनवरच झोपावे लागते. ही लाजिरवाणी बाब आहे. रेल्वे प्रशासनाने त्वरित रेल्वे पोलिसांसाठी प्रत्येक स्टेशनला सोयीसुविधा असलेले स्वतंत्र कार्यालय देणे गरजेचे आहे.
– होशियार सिंह दसोनी, सामाजिक कार्यकर्ता

First Published on: January 29, 2020 6:03 AM
Exit mobile version